फडणवीस सरकारने शंभर दिवसांत अस्वस्थ महाराष्ट्र दिला, आदित्य ठाकरे यांचा घणाघात
कोणत्याही सरकारचे पहिले शंभर दिवस हे त्या सरकारची भविष्यातील वाटचाल सांगणारे असतात. पण राज्यातील भाजप सरकारने पहिल्या शंभर दिवसांत आपल्याला काय दिले, तर अस्वस्थ महाराष्ट्र! जातीपातीत दुभंगलेला महाराष्ट्र! आता तर परिस्थिती अशी आहे की भाजपचे संविधान मानणार असाल, भाजपचे हिंदुत्व मानणारे असाल तरच तुम्ही या देशाचे नागरिक! हे सगळे भयावह चित्र पाहून संवेदनक्षम माणसाला आपला पुरोगामी महाराष्ट्र नक्की कुठे चाललाय असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा हा डाव असून तो आपण यशस्वी होऊ देणार आहोत का? त्यासाठी या जुलमी राजवटीच्या विरोधात आपल्याला वज्रमूठ आवळावीच लागेल, प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे धाडस दाखववावेच लागेल, असे जोरदार आवाहन शिवसेना नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी केले.
नाशिक येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित निर्धार शिबिरात ‘महाराष्ट्र कुठे चाललाय?’ या विषयावर आदित्य ठाकरे यांचे घणाघाती भाषण झाले. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी राज्यातील फडणवीस सरकारच्या शंभर दिवसांच्या कारभाराची चिरफाड केली. सत्तेत येताना भाजपसह त्यांच्या लाडक्या मित्रपक्षांनी आश्वासनांची बरसात केली होती. पण हे सरकार कुचकामीच नाहीतर निकामी निघाले. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार होते. पण आता 500 रुपयांवर आले आहेत. निर्लज्जपणा, कोडगेपणा अंगी असल्याशिवाय एवढे निर्ढावलेपण येत नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
राज्यात न्याय मागणेही गुन्हा
या राज्यात न्याय मागणे हा आता गुन्हा ठरला आहे, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. वैभव नाईक यांनीही कोकणातील असेच भयंकर प्रकरण उजेडात आणले. कोण आहे या प्रकरणाचा ‘आका’? कोण ड्रग्ज पुरवत आहे? कोणी पह्न केले? हे कधी जगासमोर येणार आहे की नाही, असा सवालही त्यांनी केला. महाराष्ट्रात अस्वस्थता आहे. महाराष्ट्र मागे चालला आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा शब्द देण्यात आला होता. परंतु एका तरी शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला का? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी करताच अख्ख्या सभागृहाने नाही, नाही असे जोरदार उत्तर दिले. कर्जमुक्ती देणारे फक्त उद्धव ठाकरेच होते असा उल्लेख आदित्य ठाकरे यांनी करताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विधानाचाही त्यांनी यावेळी जोरदार समाचार घेतला.
इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा हीच या सरकारची नीती आणि धोरण आहे. 135 आमदार निवडून आलेत भाजपचे. एसंशिं यांना चिटकलेत. अजित पवारही आहेत. एवढे बहुमत असूनही सरकार लंगडत आहे. ते एसंशिं तिकडे अमरावतीला होते. तिकडूनच गावाकडे चाललेत. म्हणजे पुन्हा त्यांच्यात नाराजीनाटय़ सुरू झालेय.
निष्ठावंतांच्या एकजुटीचा वज्रनिर्धार
‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘शिवसेना झिंदाबाद’ आणि ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी आज नाशिक नगरी दुमदुमून गेली. निमित्त होते शिवसेना आयोजित केलेल्या भव्य ‘निर्धार’ शिबिराचे. शिबिराची सुरुवात अंबाबाईच्या गोंधळाने करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात, तुतारीच्या निनादात नेत्यांचे स्वागत करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य छायाचित्राला शिवसैनिकांनी वंदन केले. सर्व मान्यवरांचे विचार ऐकले. निष्ठेचा जागर केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भगवा फडकवू, महाराष्ट्राच्या हितासाठी प्राणपणाने लढत राहू, भाजप व मिंध्यांना धडा शिकवू, एकजुटीने हुकुमशाहीला नेस्तनाबूत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा वज्रनिर्धार शिवसैनिकांनी केला. हा भगवा झंझावात परिवर्तनाचा होता, उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्राचे दर्शन घडवणारा आणि सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारा होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List