ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन, 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ भारतीय अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांचे शुक्रवारी (4 एप्रिल) सकाळी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी ओळखले जातात. ते ‘भारत कुमार’ या नावाने प्रसिद्ध होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात शोककळा पसरली आहे.
मनोज कुमार यांच्या निधनावर चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी शोक व्यक्त केला. महान दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते, आमचे प्रेरणास्थान आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील ‘सिंघम’ मनोज कुमार जी आता आपल्यात नाहीत. यामुळे चित्रपटसृष्टीला खूप मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दात अशोक पंडित यांनी मनोज कुमार यांना श्रद्धांजली वाहिली.
Indian actor and film director Manoj Kumar, particularly known for his patriotic films and the nickname ‘Bharat Kumar’, passes away at the age of 87 at Kokilaben Dhirubhai Ambani Hospital. pic.twitter.com/nHvvVDT2CY
— ANI (@ANI) April 4, 2025
मनोज कुमार यांचा अल्पपरिचय
मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीच्या प्रेमासाठी त्यांनी आपल्या नावात बदल केला होता. पण त्यांना खरी ओळख ‘भारत कुमार’ या नावाने मिळाली. मनोज कुमार यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी एबटाबाद (आता पाकिस्तानमध्ये) या ठिकाणी झाला. हरिकिशन गिरी गोस्वामी यांचे कुटुंब फाळणीनंतर भारतात आले आणि दिल्लीत स्थायिक झाले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख जवळून अनुभवले होते.
लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांच्या चित्रपटांमुळे ते खूप प्रभावित
झाले. यामुळे त्यांनी आपले हरिकिशन हे नाव बदलत मनोज कुमार असे केले.
मनोज कुमार यांनी कॉलेजच्या काळात अनेक नाटकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर ते मुंबईत आले. १९५७ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९६० मध्ये ‘कांच की गुड़िया’ या चित्रपटात ते पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसले. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपडा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या अनेक चित्रपटात ते झळकले. त्यांच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव ‘भारत’ असे असायचे. याच कारणामुळे चाहत्यांमध्ये ते ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List