चेंबूर-मानखुर्द मेट्रो लवकरच प्रवाशी सेवेत, पिवळ्या मार्गिकेवर चाचणीला सुरुवात
पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या मुंबई मेट्रो-2ब अर्थात पिवळ्या मार्गिकेची गाडी अखेर पुढे सरकली आहे. दीर्घकाळ रखडलेल्या या मेट्रो प्रकल्पाच्या पाच स्थानकांवर प्रवाशी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) बुधवारी चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द या स्थानकांदरम्यान मेट्रोच्या चाचणीला सुरुवात केली. या चाचणीमुळे लवकरच चेंबूर-मानखुर्द दरम्यान मेट्रो धावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हिंदुस्थानी रेल्वेच्या 172व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून बुधवारी चेंबूर-डायमंड गार्डन ते मंडाले-मानखुर्द यादरम्यान मेट्रोची ‘ट्रायल रन’ घेण्यात आली. डायमंड गार्डन, शिवाजी चौक, बीएसएनएल मेट्रो, मानखुर्द आणि मंडाले या पाच स्थानकांवर मेट्रो धावली. मुंबई मेट्रो-2ब ही पिवळी मार्गिका म्हणून ओळखली जाते. ही मार्गिका चेंबूर येथे मोनोरेल मार्गिकेशी जोडली जाते. त्यामुळे मुंबईकरांना मेट्रो मार्गिकेवरून मोनोरेलच्या प्रवासासाठी जाणेही सुकर होणार आहे. चेंबूर, मानखुर्द परिसरातील मेट्रो मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतरही प्रवाशी सेवा सुरू होऊ न शकल्याने स्थानिक रहिवाशी नाराजी व्यक्त करीत होते. बुधवारी मेट्रोची चाचणी सुरू झाल्याने रहिवाशांची आशा पल्लवित झाली आहे. ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर सुरक्षा प्रमाणपत्र जारी करण्याच्या दृष्टीने मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांमार्फत तपासणी केली जाईल. ते प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो प्रवाशी सेवेत दाखल होणार आहे.
पिवळ्या मार्गिकेवरील मेट्रो ट्रेनमध्ये सायकल सोबत नेण्यासाठी जागा, मोबाईल चार्ंजग पॉईंट्स, आयपी आधारित उद्घोषणा प्रणाली, प्रवाशी सुरक्षेची आधुनिक नियंत्रण प्रणाली यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List