भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या मनोज कुमार यांचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास
दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं आज (शुक्रवार) सकाळी निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. देशभक्तीपर चित्रपटांसाठी ते ओळखले जायचे. देशप्रेमावर आधारित या चित्रपटांमुळे ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जायचे. त्यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी ग्लॅमर विश्वात प्रवेश करताच त्यांची नावं बदलली. ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार हेदेखील त्यापैकी एक आहेत. मनोज कुमार यांचं खरं नाव हरिकिशन गिरी गोस्वामी असं आहे. इंडस्ट्रीत पाऊल ठेवल्यानंतर त्यांनी त्यांचं नाव मनोज कुमार असं बदललं. अनेक देशभक्तीपर चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर ते ‘भारत कुमार’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी एबटाबादमध्ये झाला, जो फाळणीनंतर पाकिस्तानचा हिस्सा बनला. मनोज कुमार यांच्या आईवडिलांनी तेव्हा भारताची निवड केली आणि दिल्लीला राहायला आले. मनोज कुमार यांनी फाळणीचं दु:ख स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांचा प्रत्येक चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडायचं. त्यांच्या चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी स्वत:चं नाव बदलून मनोज कुमार असं ठेवलं होतं.
मनोज कुमार हे कॉलेजमध्ये असतानाच थिएटरशी जोडले गेले होते. अखेर एकेदिवशी त्यांनी दिल्लीहून मुंबईला यायचं ठरवलं होतं. मनोज कुमार यांनी अभिनयातील करिअरची सुरुवात 1957 मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटातून केली. त्यानंतर त्यांचा ‘कांच की गुडिया’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेते होते आणि बॉक्स ऑफिसवर तो यशस्वी ठरला होता. मनोज कुमार यांनी ‘उपकार’, ‘पत्थर के सनम’, ‘रोटी कपड़ा और मकान’, ‘संन्यासी’ आणि ‘क्रांती’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केलंय. बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांचं नाव ‘भारत कुमार’ असंच असायचं. याच कारणामुळे ते चाहत्यांमध्ये ‘भारत कुमार’ म्हणून लोकप्रिय झाले होते.
मनोज कुमार यांचं कलाकारांसोबत राजकीय नेत्यांसोबतही चांगले संबंध होते. 1965 मध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यान युद्ध झालं होतं आणि या युद्धानंतर मनोज कुमार यांनी लाल बहादूर शास्त्री यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शास्त्रींनी मनोज कुमार यांना युद्धामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल चित्रपट काढण्यास सांगितलं होतं. त्यावेळी मनोज कुमार यांना चित्रपट बनवण्याविषयीचा तेवढा अनुभव नव्हता. तरीही त्यांनी ‘जय जवान जय किसान’शी संबंधित ‘उपकार’ हा चित्रपट बनवला. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List