कोर्टाच्या आवारातच नराधमावर संतप्त महिला धावून गेल्या, दहा वर्षीय चिमुरडी अत्याचार व हत्या प्रकरण
दहा वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करत तिची हत्या करून मृतदेह सहाव्या मजल्यावरून खाली फेकून दिल्याची संतापजनक घटना मुंब्यात घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी नराधम आसिफ मन्सुरी याच्या मुसक्या आवळल्या. आज नराधमाची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. दरम्यान कोर्टात उपस्थित असलेल्या संतप्त महिला त्याच्या अंगावर धावून गेल्या. यावेळी महिलांनी नराधमाला कोर्टाच्या आवारातच चोप देण्याचा प्रयत्न केला.
मुंब्यातील ठाकूरपाडा परिसरातील श्रद्धा प्राप्ती इमारतीत राहणाऱ्या नराधम आसिफ मन्सुरीने दहा वर्षीय चिमुकलीला खेळणी देण्याचे आमिष दाखवत घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर या निर्दयी नराधमाने तिच्या मानेत चाकू भोसकून हत्या केली व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह सहाव्या मजल्यावरून बाथरूमच्या डक एरियामध्ये फेकला. पोलिसांनी त्याला अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती. आज कोठडीची मुदत संपल्यानंतर पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंब्रा विभागीय कार्याध्यक्षा मार्जिया पठाण व त्यांच्या सहकारी महिलांनी आक्रोश व्यक्त करत या नराधमाला कोर्टाच्या आवारातच चप्पलने चोप देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जामिनावर सुटला तर चोप देऊ
न्यायालयाने चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आसिफचा खटला जलदगतीने चालवून त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. भविष्यात या नराधमाची जामिनावर सुटका झाली तर तो दिसेल तिथे त्याला चोप देऊ आणि त्याला जबाबदार सरकार असेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुंब्रा विभागीय कार्याध्यक्षा मार्जिया पठाण यांनी दिला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List