“मी गरोदर असताना ते दुसऱ्या महिलेसोबत..”; ओम पुरी यांच्या पत्नीचा अनेक वर्षांनंतर खुलासा
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पहिली पत्नी सीमा कपूर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. सीमा गरोदर असताना ओम पुरी यांचं दुसऱ्या महिलेसोबत विवाहबाह्य संबंध होते आणि एका ठराविक टप्प्यानंतर या सर्व गोष्टी सीमा यांच्या सहनशक्तीपलीकडे गेल्या होत्या. सीमा यांनी ओम पुरी यांना घटस्फोट दिला, परंतु त्यांचं बाळ जगू शकलं नाही. या मुलाखतीत त्यांनी असाही खुलासा केला की बाळाला गमावल्यानंतर ओम पुरी यांनी त्यांच्या सेक्रेटरीमार्फत 25 हजार रुपये पाठवले होते, परंतु त्यांनी ते स्वीकारण्यास नकार दिला होता. नंदिता नावाच्या पत्रकार महिलेच्या प्रेमात पडल्याची कबुली दिल्यानंतर ओम पुरी आणि सीमा कपूर यांच्यातील संबंध आणखीनच चिघळले होते.
ओम पुरी यांनी फोन करून अफेअरविषयी सांगितलं
आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत सीमा म्हणाल्या, “आमच्या लग्नानंतर सर्वकाही ठीक सुरू होतं, परंतु त्या एका चित्रपटाने माझं आयुष्य पूर्णपणे बदललं. माझी चांगली मैत्रीण आणि विधू विनोद चोप्रा यांची पहिली पत्नी रेणू सलुजाला अफेअरविषयी माहीत होतं. परंतु तिने, सुधीर मिश्रा आणि इतर सर्वांनी त्याबद्दल मौन बाळगणं पसंत केलं कारण त्यांना असं वाटलं की चित्रपटानंतर ते पुन्हा सुधारतील. मला बरंच नंतर दिल्लीत असताना त्यांच्या अफेअरविषयी समजलं होतं. त्यांनी मला फोन केला आणि सांगितलं की ते एका दुसऱ्या महिलेला डेट करत आहेत. माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं की ते फक्त लक्ष वेधण्यासाठी असं करत आहेत.”
सीमा गरोदर असताना ओम पुरी यांचं अफेअर
ओम पुरी यांच्या बोलण्यावरून सीमा यांना समजलं होतं की ते विनोद करत नाहीयेत. त्यांनी सीमाकडे घटस्फोटाची मागणी केली होती. “मी मुंबईला परतल्यानंतर मला सर्वकाही पहिल्यासारखं नॉर्मल वाटलं. त्यानंतर ते शूटिंगसाठी मुंबईबाहेर गेले. त्यांचं सामान आवरताना मला त्यांचे प्रेमपत्र सापडले. मी पूर्णपणे खचले होते. त्यांच अफेअर असूनही मला त्यांना कधीच घटस्फोट द्यायचा नव्हता. मला गोष्टी पूर्ववत करायच्या होत्या, कारण त्यावेळी मी गरोदर होते. त्यांना माहीत होतं की मी गरोदर आहे, परंतु यामुळे नंदिता प्रचंड असुरक्षित झाली होती. ती माझ्यासमोर त्यांना फोन करायची”, असं सीमा यांनी सांगितलं.
पतीच्या गर्लफ्रेंडकडून तमाशा
सीमा म्हणाल्या की त्या संघर्ष न करणाऱ्या व्यक्ती होत्या, परंतु आता ओम पुरी हे विभक्त होण्यासाठी फक्त कारणं शोधत होते, हे त्यांना समजून चुकलं होतं. “हळूहळू गोष्टी सहन करण्याच्या पलीकडे गेल्या. पुरी साहेब खूप दारू प्यायचे आणि नंदिता तमाशा करायची. अखेर एके रात्री मी त्यांना सोडून जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी मी तीन महिन्यांची गरोदर होते”, असं त्यांनी सांगितलं. सीमा कपूर यांचे भाऊ आणि अभिनेते अनू कपूर या घटनेनं खूप चिडले होते. त्यांनी ओम पुरी यांना कोर्टाच खेचण्याचं ठरवलं. सीमा यांना त्यांच्याकडून 6 लाख रुपयांची पोटगी मिळाली होती. परंतु बाळ गमावल्यानंतर त्यांनी पाठवलेले 25 हजार रुपये सीमा यांनी नाकारले होते.
त्या पुढे म्हणाल्या, “माझं सांत्वन करण्याचं विसरा, त्यांनी मला सेक्रेटरीमार्फत 25 हजार रुपये पाठवले होते. मी ते पैसे नाकारल्यावर त्यांचा सेक्रेटरी म्हणाला, हाच अहंकार तुला नष्ट करतोय. त्याला माझा जो अहंकार वाटला, तो माझा स्वाभिमान होता.” ओम पुरी यांनी त्यांच्या अखेरच्या क्षणात सीमा यांना अचानक फोन करून झालेल्या सर्व प्रकरणाबद्दल माफी मागितली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List