पुण्यातील तब्बल 520 पर्यटक कश्मीरमध्ये अडकले
पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाल्यानंतर फिरायला गेलेले पर्यटक घाबरले आहेत. पुण्यातून तब्बल ५२० पर्यटक कश्मीरमध्ये अडकून पडले असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. अडकलेल्या या पर्यटकांकडून आज दिवसभर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षामध्ये संपर्क केला जात होता. पर्यटनासाठी पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक पर्यटक जम्मू-कश्मीर येथे फिरायला गेले होते. परंतु दुर्दैवाने दहशतवादी हल्ला करण्यात आला. यामुळे पर्यटक घाबरले आहेत. प्रत्येक जण सुखरूप घरी पोहचण्यासाठी आटापिटा करत आहे. पुण्यातील तीन मोठे ग्रुप अडकले असून, त्यात जवळपास दीडशे ते दोनशे पर्यटक आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये असलेल्या नियंत्रण कक्षामध्ये सायंकाळपर्यंत अडकलेल्या ५२० पर्यटकांनी नावे नोंदवली गेली होती.
विशेष विमानाने पुण्यात आणणार
सरकारकडून पर्यटकांना सुरक्षित आणून पुण्याला सोडण्यात येणार आहे. त्यांच्यासाठी गुरुवारी विशेष विमानाची तयारी करण्यात आली आहे. पुण्यातील सर्व पर्यटक गुरुवारी पुण्यात विशेष विमानाने येतील. जम्मू-कश्मीरमध्ये अडकलेल्या सर्व पर्यटकांना सुखरूपपणे आणण्याची जबाबदारी सरकारची असून, कोणीही घाबरून जाऊ नये, असे आवाहन मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
शिरूर, हवेली, दौंड परिसरातील ६९ पर्यटक
उरुळीकांचन येथील मेलेडी ट्रॅव्हल्समधून शिरूर-हवेली व दौड परिसरातील ६९ पर्यटकांना घेऊन ज्योती गुरुंगे या कश्मीरला गेल्या आहेत. सध्या हे पर्यटक औनगरमध्ये आले असून, उद्या सकाळी ते विमानाने पुण्याला येणार आहेत, कश्मीर पाहून झाल्यानंतर ते अमृतसरला जाणार होते. मात्र, पहलगाम येथील हल्ल्यानंतर सर्व बुकिंग रद्द करून, आपल्याला घरी म्हणजेच महाराष्ट्रात हे सर्व दाखल होणार आहेत.
ड्रायफ्रूट घ्यायला थांबलो म्हणून आम्ही वाचलो
बोरिऐंधी (ता. हवेली) येथील रोहिनी जीवन गायकवाड यांच्यासह सातजण श्रीनगरमधून पहलगामकडे इनोव्हा वाहनातून पुढे जाण्यास निघालो. वाटेतले अक्कलबाग पाहून ड्रायफ्रूट घेण्यास थांवले. नंतर बरसाल व्हॅली येथे पोहोचताच, वाहनाच्या ड्रायव्हरला स्थानिकांनी माघारी जाण्यास सांगितले. समोरून घोडे जोर जोरात येत होते. तर, समोरील टेकडीवर गोळीबाराचा आवाज ऐकू आला, दोन तास एका हटिल पार्किंगमध्ये थांबल्यावर स्थानिकांनी आधार दिला आणि प्रेमाने वागणूक दिली. नंतर मिलिटरीने रस्ता रिकामा केल्यानंतर आम्ही सर्वजण माघारी श्रीनगर या ठिकाणी पोहोचलो. ड्रायफ्रूट व इतर खरेदी करण्यास थांबलो नसतो तर जिवंत राहिलो नसतो, अशी प्रतिक्रिया दिली.
कश्मीरमधील संपर्क क्रमांक
श्रीनगर जिल्हा प्रशासनाने पर्यटकांना आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधता यावा, यासाठी श्रीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात मदतकक्ष स्थापन केला आहे. या कक्षात दूरध्वनी ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४६३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सअॅप ७००६०५८६२३, ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
पहलगाममधील मिनी स्विईलैंडमध्ये पर्यटकांना आपण नेत नाही. घटना घडलेल्या भागात आमच्याकडील पर्यटकांना आम्ही पाठवत नाही, बरसाल वॉली म्हणजेच मिनी स्विलैिंड येथे गाडी जात नाही. त्या भागात जाण्यासाठी घोड्यावरून जावे लागते. बेताब आणि चंदन व्हॅली ही दोन ठिकाणे आपण स्थानिक गाईडमार्फत दाखवितो. त्यामुळे आमच्याकडील प्रवासी सुरक्षित आहेत. दूर मॅनेजरमार्फत त्यांच्या सुरक्षेबाबत उपाययोजना केल्या जात आहेत. पुणेकरांनी घाबरू नये.
नीलेश भन्साळी, अध्यक्ष, ट्रॅव्हल्स एजन्सी असोसिएशन, पुणे
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List