Pahalgam Terror Attack – जेवणात ‘मीठ’ जास्त झालं म्हणून 11 पर्यटकांचा वाचला जीव!
जम्मू-कश्मीरातील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात भयंकर दहशतवादी हल्ला झाला. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या पर्यटकांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचे कुटुंबीय आणि या हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले पर्यटक तिथे नक्की काय घडले याबाबत अंगावर काटा येणारी आपबीती सांगत आहेत.
केरळ येथील 11 सदस्यांचे कुटुंब जम्मू-कश्मीर येथे पर्यटनासाठी गेले होते. परंतु जेवणामध्ये मीठ जास्त झाले आणि ढाबा चालकाने पुन्हा जेवण बनवण्यासाठी घेतलेला वेळ यामुळे त्यांचा जीव वाचला. याबाबत आता या कुटुंबानेच माहिती दिली आहे.
कोची येथे राहणारी लावण्या आणि अन्य 10 जण असे एकूण 11 जणांचे कुटुंब ज्या दिवशी दहशतवादी हल्ला झाला त्याच दिवशी पहलगाम येथे निघाले होते. लावण्यासह तिचे पती एल्बी जॉर्ज, त्यांचे तीन मुलं, सासू-सासरे, बहीण आणि तिचे कुटुंब असे सगळे जण श्रीनगर येथे पोहोचले.
पहलगाम येथे दोन दिवस राहण्याची आमची योजना होती, कारण आम्हाला हा निसर्गरम्य परिसर डोळे भरून पहायचा होता. पहलगाम पासून आम्ही फक्त दोन किलोमीटरवर होतो. एका ढाब्यावर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. आम्ही ऑर्डर केलेल्या मटण रोगन जोशमध्ये जास्त मीठ पडले होते, त्यामुळे ढाबा चालकाने आमच्यासाठी दुसरे जेवण बनवण्यास सुरुवात केली, असे लावण्याने सांगितले.
Pahalgam Terror Attack – देवानेच आम्हाला वाचवले! अतुल कदम यांनी मानले देवाचे आभार
आम्ही जेवण करत असतानाच 10-20 घोडे वेगाने खाली उतरताना आणि सैरावैरा धावताना दिसले. काहीतरी गडबड असल्याने घोडे पळत असावे असे आम्हाला वाटले. सुरुवातीला आम्हाला भूस्खलन होत असावे असे वाटले. त्यामुळे आम्ही जेवण आटोपून वर जाण्याचा निर्णय घेतला. परंतु काही वाहन चालकांना हाताने इशारा करून तिकडे जाऊ नका असे सांगितले. सीआरपीएफ आणि पर्यटकांमध्ये काहीतरी राडा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही वर जाण्याचा निर्णय रद्द केला आणि जिथे होतो तिथेच फोटो घेतले. याचवेळी एक महिला रडत सीआरपीएफच्या जवानांसोबत येताना दिसली. त्यानंतर मित्र परिवार आणि कुटुंबियांचे फोन सुरू झाले. आम्हाला काही कळत नव्हते नक्की काय झाले. आम्ही बातम्या बघितल्या तेव्हा समजले की आम्ही किती मोठ्या संकटातून वाचलो, असेही लावण्याने सांगितले.
आम्ही गेल्या दोन दिवसांपासून व्यवस्थित जेवण केले नव्हते. परंतु त्या दिवशी माझ्या नवऱ्याने ढाब्यावर थांबण्याचा निर्णय घेतला आणि जेवण करूनच वर जाऊ असे म्हटले. आम्ही मागवलेल्या मटण रोगन जोशमध्ये जास्त मीठ होते, तसेच खूप हाडंही होते. सासू-सासरे वयस्कर असल्याने त्यांना ते मटण खाणे अशक्य होते. आम्ही याबाबत विचारले असता ढाबा चालकाने पुन्हा जेवण बनवले. यात उशीर झाल्याने आमचा जीव वाचला, असेही लावण्याने सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List