पत्नी आणि मुलीसमोरच अतुलच्या डोक्यात, छातीत गोळ्या झाडल्या; साडू राहुल अकुल यांचे शब्दही गोठले
>> आकाश गायकवाड
पत्नी अनुष्का आणि मुलगी ऋचासह अतुल मोने पहलगामला पर्यटनासाठी गेले. गोळ्या झाडणाऱ्या दहशतवाद्यांनी त्यांना धर्म विचारला तेव्हा आम्ही हिंदू आहोत असे अतुल यांनी सांगताच दहशतवाद्यांनी पत्नी आणि मुलीसमोरच त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. अतुल रक्ताच्या थारोळ्यात कोसळताच अनुष्का आणि ऋचाने टाहो फोडला. याबाबतची माहिती देताना अतुल यांचे साडू राहुल अकुल यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि शब्दही गोठून गेले होते.
डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी येथील श्रीराम अचल सोसायटीत मोने कुटुंब राहते. अतुल मोने हे रेल्वे खात्यात कामाला होते. त्यांची मुलगी ऋचा हिची बारावीची परीक्षा आटोपल्याने यंदा पर्यटनासाठी कश्मीरला जाऊ असा प्लॅन अतुल मोने यांनी आखला. अतुल मोने पत्नी, मुलगी आणि चुलत भावासह पहलगामला पोहोचले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पत्नी आणि मुलीसमोरच दहशतवाद्यांनी त्यांच्या डोक्यात आणि छातीत गोळ्या झाडल्या. ते निपचितपणे कोसळले. हा धक्का त्यांच्या पत्नी आणि मुलीला सहन झाला नाही. एका क्षणात होत्याचे नव्हते कसे झाले, हे काय झाले? असे त्या आजूबाजूला असलेल्या लोकांना विचारत होत्या, अशी माहिती राहुल अकुल यांनी दिली. मोने यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण ठाकूरवाडी परिसरावर शोककळा पसरली आहे.
शिवसैनिकांनी धाव घेत कुटुंबीयांना दिला आधार
या दुर्दैवी घटनेचे वृत्त कळताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्यासह शिवसैनिकांनी धाव घेत मोने, लेले आणि जोशी कुटुंबीयांना आधार दिला. ही घटना शब्दांत व्यक्त करण्यापलीकडची आहे. आम्ही सर्व शिवसैनिक या कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत हे सांगण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी आम्ही आलो आहोत असे म्हात्रे म्हणाले. मृत्युमुखी पडलेल्या या तिघांचाही दोष काय, दहशतीखाली जगणं मुश्कील झाले आहे आणि या दहशतीला जबाबदार कोण, याचे उत्तरही सरकारने द्यावे अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List