जमीन आणि इतर सवलती उकळणाऱ्या रुग्णालयांची यादी तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांची आदेश; धर्मादाय रुग्णालयांवर विशेष पथकाद्वारे वॉच
राज्यातल्या काही धर्मादाय रुग्णालयांत अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी राज्य सरकारकडे येत आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील भूखंड आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयांची यादी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती. सवलती उकळून दुर्बल घटकांना उपचार न देणाऱ्या धर्मादाय रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.
वीस टक्के खाटा राखीव आवश्यक
धर्मादाय रुग्णालयात 10 टक्के खाटा निर्धन घटक, तर 10 टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार व वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रुग्णालयांनी कोणतीही अनामत रक्कम घेऊ नये, असे आदेश फडणवीस यांनी दिले.
आतापर्यंत 7 हजार रुग्णांवर उपचार
धर्मादाय रुग्णालय कक्षाची स्थापना 2023 रोजी झाली असून आतापर्यंत 10 हजार 738 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यामध्ये 7 हजार 371 रुग्णांवर उपचार झाले असून 24 कोटी 53 लाख रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List