साताऱ्यात साकारतोय ‘हरित स्वर्ग’
तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला असताना, या डोंगरात वणवा पेटलाय. या ठिकाणी झाडांना कुणीतरी आग लावली आहे, अशा बातम्या चोहोबाजूने येत आहेत. मात्र, अशावेळी सातारा शहराला लागून असलेल्या चार भिंती टेकडीला विविध प्रकारच्या वनसंपदेने समृद्ध करून तिथे हरित स्वर्ग निर्माण करण्यासाठी साताऱ्यातील निसर्गप्रेमींचा एक समूह अविरत प्रयत्न करत आहे. सर्वांनाच प्रेरणा देईल, अशी ही आगळीवेगळी स्फूर्तिगाथा आहे.
सर्वत्र बेसुमार वृक्षतोड सुरू आहे. पर्यावरणाचा हास प्रचंड गतीने सुरू आहे. अशा स्थितीत या समूहाने झपाटल्याप्रमाणे सुरू केलेले काम हे इतरांसाठी दिशादर्शक ठरते आहे. या निसर्गप्रेमी ग्रुपचे नाव आहे ‘हरित सातारा’. चार भिंती टेकडीवर या समूहाचे काही सदस्य दररोज सकाळी तर काही सदस्य दररोज सायंकाळी श्रमदान करत असतात. ‘हरित सातारा’ने या टेकडीवर पळस, पांगारा, वड, पिंपळ, उंबर, काळा कुडा, कडूलिंब, कांचन, हेळा, जांभूळ, काटेसावर, शिवण, कुसुंब असे विविध प्रकारचे जवळपास 1500 वृक्ष लावले आहेत.
मदतीला धावतात असंख्य हात
अनेक निसर्गप्रेमी या समुहाला मदत करत असतात. सातारा शहरातील राजपुरोहित स्वीट्स, चंदूकाका ज्वेल्स व कुणबी समाज संघ यांनी या समूहासाठी 5000 लिटरची एक सिमेंट काँक्रीटची टाकी बांधून दिली असून, या टाकीजवळ आता 5 लिटर क्षमतेचे 200 कॅन ठेवलेले आहेत. टेकडीवर फिरायला येणारे अनेक निसर्गप्रेमी आता नित्यनियमाने तेथील रोपांना पाणी घालत असतात. याशिवाय शाळा, कॉलेजेस, वेगवेगळ्या अॅकॅडमीमधील विद्यार्थीसुद्धा तिथे येतात आणि श्रमदान करतात. फिरायला येणारे अनेक सातारकर आता तिथे आल्यावर हे सर्व पाहून नकळत या कामात सहभाग देतात. तिथल्या पाच-दहा रोपांना पाणी घालूनच पुढे जातात.
श्रमदानात परदेशी पाहुण्यांचाही सहभाग
आज सकाळी साताऱ्यातील क्रेन कंपनीतील अधिकारी वर्ग व स्टाफने तिथे श्रमदान केले. या कंपनीत भेट द्यायला आलेल्या कंपनीच्या आयर्लंड युनिटमधील अधिकारी फील व्हाईट व जॉन हे परदेशी पाहुणेसुद्धा श्रमदानात सहभागी झाले होते
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List