गायक हंसराज हंस यांच्या पत्नीचं निधन; गेल्या काही दिवसांपासून होत्या आजारी
सूफी गायक आणि दिल्लीतील भाजपचे माजी खासदार पद्मश्री हंसराज हंस यांची पत्नी रेशम कौर यांचं बुधवारी निधन झालं. त्या 62 वर्षांच्या होत्या. गेल्या काही काळापासून त्या आजारी होत्या आणि टागोर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. रेशम यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, दुपारी 1 वाजता रेशम यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. रेशम आणि हंसराज हंस हे प्रसिद्ध गायक दलेर मेहंदी यांचे व्याही आहेत. दलेर मेहंदी यांची मुलगी अजीत कौरचं लग्न रेशम-हंसराज यांचा मुलगा नवराज हंसशी झालंय.
पंधरा दिवसांनी म्हणजेच 18 एप्रिल रोजी हंसराज हंस आणि रेशम यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. परंतु त्याआधीच रेशम यांनी या जगाचा निरोप घेतला. रेशम यांच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबातील आणि इंडस्ट्रीतील अनेक लोक त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. ‘दैनिक भास्कर’ने दिलेल्या वृत्तानुसार, रेशम कौर यांचा भाऊ परमजीत सिंहने सांगितलं की बुधवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांचं निधन झालं. गेल्या पाच दिवसांपासून त्या रुग्णालयात दाखल होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना अचानक पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला होता.
हंसराज हंस हे पंजाबी आणि सूफी संगीतविश्वातील एक मोठं नाव आहे. पत्नी रेशम कौर यांच्या निधनाने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हंसराज हंस यांनी 18 एप्रिल 1984 रोजी रेशम यांच्याशी लग्न केलं होतं. त्यांना दोन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव युवराज हंस तर धाकट्या मुलाचं नाव नवराज हंस आहे. गायक असण्यासोबतच हंसराज हे भाजपचे खासदारही राहिले आहेत. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपने दिल्लीतून हंसराज हंस यांना तिकिट दिलं होतं. त्यावेळी निवडणुकीत त्यांना विजय झाला होता. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हंसराज यांना भाजपने पंजाबमधील फरीदकोट इथून तिकीट दिलं होतं. परंतु तिथे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List