कष्टकऱ्यांना आंबट चिंचांनी दिला रोजगाराचा गोडवा! ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना
ग्रामीण भागात चिंच व्यवसायाला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी फेब्रुवारी ते मे या ४ महिन्यांदरम्यान येणाऱ्या हंगामात यंदा मात्र चांगला दर मिळत आहे. चिंचेच्या वृक्षांचे मालक, झाड फुलोऱ्यात असतानाच सौदा करणारे छोटे व्यावसायिक, बांबूच्या साह्याने चिंचा पाडणारे व जमिनीवरील चिंचा वेचणारे मजूर, किलोप्रमाणे घरोघरी चिंचझोडणी करणाऱ्या कष्टकरी महिला तसेच गर, चिंचोके आणि टरफले वेगळी करणे अशी ही प्रक्रिया आहे. मोठे व्यापारी हा तयार माल खरेदी करून शहरात ७ ते ८ हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री करत आहेत. पैठणच्या खेड्यापाड्यातील हातांना आंबट चिंचांच्या व्यवसायातून रोजंदारीचा गोडवा प्राप्त झाला असून, ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.
पैठण तालुक्यातील बहुतांश गावांत चिंच वृक्ष मोठ्या प्रमाणावर आहेत. विशेषतः गोदावरी नदीकाठासह बालानगर, पाचोड आडुळ, चितेगाव, बिडकीन, ढोरकीन, विहामांडवा व लोहगाव येथे चिंचेची जुनी महाकाय झाडे आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चिंच व्यवसायाला सुरुवात झाली. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की हातावर पोट असलेल्यांना चिंच फोडणीचे काम मिळते. त्यातून संसाराचा गाडा हाकण्यासाठी आर्थिक आधार मिळत आहे. फोडणीसाठी प्रतिकिलो ८ ते १० रुपये अशी मजुरी दिली जात आहे. सध्या बाजारात ३ ते ७ हजार रुपये क्विंटलने चिंचेची खरेदी केली जात आहे.
तसेच ग्रामीण भागातील महिलांना चिंच फोडणीतून दिवसभरात ४०० रुपयांची कमाई होत आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने चिंच झोडणीचे कामही जोरात सुरू आहे. यंदा भाव बऱ्यापैकी मिळत असल्याने आंबट चिंच खरेदीदार मजूर व उत्पादकांनाही गोड ठरली आहे.
शहरात चिंच अन् चिंचोक्यांची आकर्षक पॅकिंगमध्ये विक्री !
दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्यामध्ये चिंचेच्या झाडांना फुले पाहून खरेदी करणाऱ्यांत लहान व्यापाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. २ ते ५ झाडे घेऊन हे व्यापारी चिंचा फोडून गावातील मोठ्या व्यापाऱ्यांना विकत आहेत. मोठे व्यापारी चिंचा व चिंचोक्यांचा तयार माल मोठ्या शहरात विक्री करत आहेत. तेथे प्रक्रिया केल्यानंतर आकर्षक पॅकिंगमध्ये अव्वाच्या सव्वा दराने खरेदी-विक्री केली जाते. यावर्षी झाडांचा विस्तार, लागलेली फळे-फुले, बहराचे प्रमाण यांचा अंदाज पाहून व्यापाऱ्यांनी सौदे ठरवले आहेत. चांगली झाडे ४ ते ५ हजार रुपयांना खरेदी करण्यात आली आहेत.
आणखी २ महिने रोजगार
जून-जुलै महिन्यांत चिंचेची फुले पूर्णपणे विकसित होतात. त्यानंतर चिंचा किती लगडणार, याचा आडाखा अनुभवी व्यावसायिक घेतो. त्यामुळे काही व्यापारी फुले असतानाच तर काही व्यापारी चिंचा लागल्यानंतर सौदा निश्चित करतात. फेब्रुवारीपासून चिंचा फोडण्याची कामे सुरू झाली आहेत. मे महिन्यापर्यंत ग्रामीण भागात ही रोजगार निर्मिती कायम राहणार आहे. याकाळात नेहमीप्रमाणे शेतीच्या कामांना मजुरांची टंचाई भासत आहे. झाडावर चढून बांबूच्या काठीने झोडपून चिंचा खाली पाडण्यासाठी लगबग सुरू आहे. जमिनीवर पडलेल्या चिंचा वेचणे, टरफल बाजूला करणे, चिंचा फोडून गर व चिंचोके वेगळे करणे यासाठी तरुण मजुरांची संख्या जास्त आहे. चिंचा झोडपण्यासाठी ५०० रुपये रोज मिळत आहेत. चिंचा वेचणाऱ्या महिलांना २५० रुपये मजुरी मिळत असून टरफल बाजूला केल्यानंतर चिंचा फोडल्या जातात. चिंचेपासून साधारणतः ५५ टक्के गर, १४ टक्के चिंचोके व ११ टक्के टरफल व शिरांचे उत्पादन मिळते, अशी माहिती कामगार अमोल नरवडे यांनी दिली.
ग्रामीण भागातील महिलांना चिंच फोडणी करण्यासाठी घरपोच चिंच दिली जात असल्याने अनेक महिला घरातील कामे करीत चिंच फोडणी करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावत आहेत. १ महिला दिवसाला २५ ते ४०
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List