पंतप्रधान नरेंद्र मोदी गुढीपाडव्याला नागपुरात, RSS स्मृती भवन आणि दीक्षाभूमीला भेट देणार,कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याला नागपूरात दरवर्षी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत संबोधन करीत असतात. यंदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत एकाच व्यासपीठावर असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी संत्रानगरी नागपूर संपूर्ण भगवी झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे नागपूरातील अनेक चौक भगवेमय झाले आहेत. चौका चौकात भाजपचे झेंडे आणि भगव्या पताका उभारल्या गेल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह शीगेला पोहचला आहे. नागपुरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पंतप्रधानांचा ताफा जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेट्स उभारण्यात आले आहेत.
उद्या ३० मार्च रोजी गुढी पाडव्याला पंतप्रधान नागपुरातच असणार आहेत. पंतप्रधानांचा कार्यक्रम भरगच्च असून दिवसभर त्यांचा मुक्काम नागपूरातच असणार आहे. यावेळी पीएम मोदी संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर यांच्या नावाने उभारल्या जाणाऱ्या नेत्र रुग्णालय आणि संशोधन केंद्राचे भूमीपूजन करणार आहेत. गुढी पाडव्यानिमित्त होणाऱ्या सीमोल्लंघन आणि गुढी उभारण्याच्या सोहळ्यात मोदी सहभागी होतील.त्यानंतर आरएसएसचे संस्थापक आणि पहिले सरसंघचालक केशव बलिराम हेडगेवार यांना ते श्रद्धांजली वाहणार आहेत. आरएसएसमध्ये गुढी पाडव्याच्या वर्ष प्रतिपदेचे खुप महत्व असते. जो हिंदू आणि मराठी वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.
दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे पहिले पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीला भेट देणार आहेत.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना पंतप्रधान अभिवादन करणार आहेत. 1956 साली दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब यांनी हजारो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दीक्षाभूमीला दोनदा भेट देणारे नरेंद्र मोदी देशाचे पहिले पंतप्रधान आहेत. यापूर्वी 14 एप्रिल 2017 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी दीक्षाभूमीवर आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीक्षाभूमी भेटीवेळी स्मारक समितीचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. गेल्यावेळी दीक्षाभूमीवर काही मिनिटे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ध्यान साधना केली होती. त्यामुळे उद्याच्या दौऱ्यातही दीक्षाभूमीवर स्मारक समितीने पंतप्रधानांसाठी ध्यान साधनेची तयारी केली आहे.यापूर्वी दीक्षाभूमीवर अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आले होते.
पीएम मोदी यांच्यासाठी दौरा का महत्वाचा
संघ आणि पीएम मोदी यांचा स्नेह सर्वांना माहीती आहे. परंतू तरीही संघाच्या कार्यक्रमात मोदी यांनी सहभागी झाल्याचे कधी पाहायला मिळालेले नाही. या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच व्यासपीठावर असणार आहेत. माधव नेत्रालयाच्या विस्तारीत संशोधन केंद्राच्या पायाभरणीच्या या कार्यक्रमात स्मारक समितीचे भैय्याजी जोशी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. नागपूर स्थित संघाच्या मुख्यालयाचा दौरा करणारे पंतप्रधान मोदी हे पहिलेच पंतप्रधान ठरणार आहेत. मोदी यांचा हा दौरा यासाठी देखील महत्वाचा आहे की यंदाचे संघाचे शताब्दी वर्षे आहे.भाजपाचे प्रदेशचे अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी सांगितले की मोदी याआधी संघाचे एक प्रचारक म्हणून या स्मारकात आले होते. परंतू पंतप्रधान झाल्यानंतर ते प्रथमच येथे येणार आहेत. पंतप्रधान मोदी हे ऑक्टोबर 2001 रोजी मुख्यमंत्री बनले होते. त्यानंतर ते कधीच संघाच्या मुख्यालयात आले नव्हते.नरेंद्र मोदी यांनी साल 1972 मध्ये संघाचे प्रचारक म्हणून आपला संघातील प्रवास सुरु केला होता.
सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेसच्या सुविधांचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘सोलार डिफेन्स अँड एअरोस्पेस’ कंपनीतील नव्या सुविधांचे उद्घाटन होणार आहे.सोलार कंपनीमध्ये संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे स्फोटके आणि संबंधित साहित्याची निर्मिती करण्यात येते. तसेच सोलार कंपनीमध्ये भारतीय बनावटीच्या UAV ड्रोनची निर्मिती करण्यात येते. सोलार कंपनीतील 1250 मीटर लांबीच्या धावपट्टीचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. यासोबतच लॉइटरिंग म्युनिशन टेस्टींग रेंज अँड वॉरहेड सुविधेचेही पंतप्रधान मोदी उदघाटन करणार आहेत.
माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचे भूमिपूजन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माधव नेत्रालयाच्या विस्तारित प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. साडे तीन हजार पाहुण्यांना निमंत्रण दिलेले आहे.सगळ्यांना पास वितरित करण्यात आले आहेत. माधव नेत्रालाय कार्यक्रम स्थळी पंतप्रधान 10 वाजता येणार आहेत. त्याआधी आरएसएस स्मृती भवन आणि दीक्षा भूमीला पंतप्रधान भेट देणार आहेत.कार्यक्रम स्थळ वासुदेव नगर मेट्रो स्टेशनपासून अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने निमंत्रितांनी मेट्रोने येण्याचं आवाहन आयोजकांनी केले आहे.
असा असणार पंतप्रधानांचा कार्यक्रम
– गुढीपाडव्याला 30 मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर
– पंतप्रधान मोदी यांच्या सुरक्षेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त, एसपीजीचा ताफा शहरात दाखल
– पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी नागपूरात चार हजार पेक्षा जास्त पोलीस तैनात
– पंतप्रधान मोदीजी सकाळी 8.30 वाजता नागपूर विमानतळावर येतील. 9 वाजता हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात आगमन
– सकाळी 9.30 पंतप्रधान मोदी यांचं दीक्षाभूमी येथे आगमन
– 10 वाजता माधव नेत्रालयाच्या कार्यक्रमास उपस्थिती
– त्यानंतर सोलार एक्सप्लोझिव्ह कंपनीला भेट
– दुपारी 1.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्तीसगडसाठी रवाना होणार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List