‘तारक मेहता..’मध्ये अखेर दयाबेन परततेय; शूटिंगलाही सुरुवात
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. गेल्या 17-18 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. जेठालाल, दयाबेन, बापूजी, टप्पू, बबिताजी, अय्यर.. अशी सगळी पात्रं पसंतीस उतरली आहेत. गेल्या काही वर्षांत यातील अनेक कलाकारांनी मालिकेचा निरोप घेतला. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे दिशा वकानी. ‘तारक मेहता..’मध्ये तिने दयाबेनची भूमिका साकारली होती. 2017 मध्ये दिशाने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता. मात्र तिचा हा ब्रेक इतका लांबला की आता आठ वर्षे होत आली तरी ती मालिकेत परतली नाही. दयाबेन मालिकेत कधी परतणार, असा सवाल वारंवार चाहत्यांकडून विचारण्यात आला. आता लवकरच चाहत्यांना आनंदाची बातमी मिळणार आहे.
‘न्यूज 18’ने दिलेल्या वृत्तानुसार, मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी हे दयाबेनच्या भूमिकेसाठी सतत ऑडिशन्स घेत आहेत. अखेर त्यांनी एका अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केला आहे. ही अभिनेत्री कोण आहे, याचा खुलासा अद्याप झाला नाही. परंतु तिच्यासोबत टीमने मॉक शूटिंगला सुरुवात केली आहे. “होय, हे बरोबर आहे. असितजी हे नव्या दयाबेनच्या शोधात होते आणि नुकतेच ते एका अभिनेत्रीच्या ऑडिशनने प्रभावित झाले आहेत. त्या अभिनेत्रीसोबत सध्या मॉक शूट सुरू आहे. गेल्या आठवडाभरापासून ही शूटिंग सुरू आहे”, अशी माहिती ‘न्यूज 18’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
दिशाने 2017 मध्ये ही मालिका सोडली होती. बाळंतपणाच्या रजेवर गेलेली दिशा पुन्हा मालिकेत परतलीच नाही. तिला मालिकेत परत आणण्यासाठी दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी बरेच प्रयत्न केले. मात्र दिशा सध्या तिच्या खासगी आयुष्यावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं म्हटलं गेलं. आतापर्यंत या मालिकेत अनेक नवीन कलाकार आले आणि जुने कलाकारांची एक्झिट झाली. यामध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी, टप्पूची भूमिका साकारणारा राज अनाडकत, गोलीची भूमिका साकारणारा कुश शाह, तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढा, सोनूची भूमिका साकारणारी झील मेहता यांचा समावेश आहे. मात्र कलाकार जुने असो किंवा नवीन.. प्रत्येक भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List