एकदा संपलं की संपलं..; झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेनं निरोप घेतल्यानंतर अभिनेता भावूक

छोट्या पडद्यावर अनेक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतात. त्यापैकी काही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतात. त्यातील कलाकारांना भरभरून लोकप्रियता मिळते. मात्र तरीही काही कारणास्तव मालिकांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागतो. झी मराठी वाहिनीवरील अशीच एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय. त्यानिमित्त या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याने सोशल मीडियावर अत्यंत भावूक पोस्ट लिहिली आहे. मालिकेच्या सेटवरील अनेक आठवणीसुद्धा त्याने फोटोच्या रुपात शेअर केल्या आहेत. ही मालिका दुसरी तिसरी कोणती नसून ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही आहे. ऑगस्ट 2022 मध्ये ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अल्पावधीतच या मालिकेनं प्रेक्षकांची मनं जिंकली होती. मात्र आता हीच मालिका बंद होत आहे. या मालिकेत अर्जुनची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुरामने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट लिहिली आहे.
रोहित परशुरामची पोस्ट-
‘पावणेतीन वर्ष.. 850 एपिसोड्स.. 2000 पेक्षा जास्त सीन्स.. असंख्य इमोशन्स (भावना).. अगणित चांगल्या आठवणी.. एक आसगाव आणि एक अर्जुन वर्षा विनायक कदम.. प्रवास थांबला. एकदा संपलं की संपलं.. ते परत नाही येत,’ अशी भावूक पोस्ट त्याने लिहिली आहे. रोहितच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘आसगाव आणि अर्जुन वर्षा विनायक कदम खूप भारी समीकरण आहे. तुम्ही सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं,’ असं एकाने लिहिलं. तर ‘प्रेक्षकांचं प्रेम हेच तुमच्या कामाची पोचपावती,’ असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मालिकेचा प्रवास थांबला तरी प्रेक्षकांच्या मनात तुम्ही नेहमीच डॅशिंग अर्जुन म्हणून राहाल’, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं आहे.
‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत शिवानी नाईक, संतोष पाटील, रोहित परशुराम, ऋषभ कोंडवार, नीलम वाडेकर, सुनिल डोंगर, सुनिल शेट्ये यांच्या भूमिका होत्या. अप्पी आणि अर्जुनच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. तर चिमुकल्या अमोलचीही भूमिका प्रेक्षकांना खूप भावली होती. या मालिकेनं जरी प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी त्याजागी एक नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List