Disha Salian : दिशा सालियन प्रकरणात पहिल्यांदाच केरळ कनेक्शन समोर; मोठा खुलासा
दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यात वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान त्यानंतर आता दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, त्यासाठी ती त्यांना पैसे द्यायची त्यामुळे ती निराश होती असा देखील या प्रकरणात आरोप केला जात आहे. दरम्यान या प्रकरणावर आता दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले ओझा?
दिशाच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध होते, ती त्यांना पैसे द्यायची, त्यामुळे ती निराश होती. हे सारं मुंबई पोलिसांनी क्लोजर रिपोर्टमध्ये लिहिल्याचा दावा केला जात आहे. मात्र जर तो रिपोर्ट मुंबई पोलिसांनी मागे घेतला आहे, तर मग तो वैध कसा? त्यातील गोष्टींना काही अर्थच उरत नाही. त्यानंतर एसआयटीची स्थापना झाली, आणि नव्यानं तपास सुरू झाला आहे. त्यामुळे या रिपोर्टचा आरोपींना बचावात काहीही फायदा होणार नाही, आरोपींच्या प्रवक्त्यांना काय आनंद करायचाय तो करू द्या, असं ओझा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आम्ही काही नवे पुरावे मीडियासमोर सादर करत आहोत. दिशाचा मित्र रोहन रायनं वर्षभरानंतर एका मुलाखतीत दिशाच्या मृत्यूबाबत काही गौप्यस्फोट केले होते. 15 नोव्हेंबर 2022 रोजी एका वृत्तपत्रात ही मुलाखत छापून आली होती. दिशा प्राण्यांच्या समस्यांबाबत फार संवेदनशील होती, केरळमध्ये एका गरोदर हत्तीणीसोबत घडलेल्या घटनेनं ती नैराश्येत होती, असं म्हटलं होतं. पोलिसांच्या अहवालात तिच्या वडिलांचे विवाहबाह्य संबंध असल्यानं ती नौराश्येत होते, असं लिहिल्याचं बोललं जात आहे. मालवणी पोलिसांनी किती खोटे पुरावे तयार केले आहेत, यासाठी त्यांना नोबल पुरस्कार मिळायला हवा, असं सतीश सालियन यांच्या वकिलांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List