सावळ्या रंगामुळे 1000 वेळा रिजेक्ट झाली; स्टारकिडशी लग्न, घर तोडल्याचा आरोप; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री?
अभिनय क्षेत्रात जसा अभिनय तर महत्त्वाचा असतोच पण काहीवेळेला बऱ्याच अभिनेत्रींना त्यांच्या रंगामुळेही रिजेक्शन पचवावं लागतं. असे अनेक किस्से अनेक अभिनेत्रींसोबत घडले आहेत ज्यांकडे टॅलेंट असूनही फक्त त्यांच्या उंचीमुळे किंवा त्यांच्या रंगामुळे त्यांना रिजेक्शन सहन करावं लागलं आहे. असाच एक किस्सा एका अभिनेत्रीसोबतही घडला आहे.
मुख्य म्हणजे या अभिनेत्रीने सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं परंतु तिच्या सावळ्या रंगामुळे तिला हजारवेळा नकारांना सामोरं जावं लागलं. पण तिने हार न मानता जिद्दीने तिची मेहनत सुरु ठेवली आणि अखेर यश मिळवलंच. तिने अनेक मोठे प्रोजेक्ट, वेब सीरिज केल्या त्यातील तिच्या अभिनयाचं तेवढंच कौतुकही झालं.
सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलं होतं
ही अभिनेत्री आहे शोभिता धुलिपाला. शोभिताचा जन्म 31 मे 1992 रोजी आंध्र प्रदेशातील तेनाली येथील एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला. ती 16 व्या वर्षी मुंबईत आली. तिने 2013 च्या फेमिना मिस इंडियामध्ये भाग घेतला होता आणि ती उपविजेती होती. यानंतर, तिने फिलीपिन्समध्ये झालेल्या मिस अर्थ 2013 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले, परंतु ती टॉप 20 मध्ये स्थान मिळवू शकली नाही.
रंगामुळे अनेकदा नाकारण्यात आलं
शोभिताने 2016 मध्ये विकी कौशलसोबत ‘रमन राघव 2.0’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण त्याआधी तिने 1000 एक ऑडिशन्स दिल्या होत्या आणि तिच्या सावळ्या रंगामुळे तिला अनेक वेळा नाकारण्यात आलं होतं.
एका मुलाखतीत शोभिता म्हणाली, “जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा प्रत्येक गोष्ट ही संघर्षासारखी असते. मी चित्रपटांमध्ये फार काम केलं नाहीये. कारण अॅडच्या ऑडिशन दरम्यान मला अनेकदा सांगण्यात आलं की मी गोरी नाहीये. मला थेट माझ्या तोंडावर सांगण्यात आलं की मी तेवढी सुंदर नाहीये जेवढं जाहिरातींसाठी दिसायला हवं”
1000 ऑडिशन्स देऊनही रिजेक्ट
तसेच दुसऱ्या एका मुलाखतीत शोभिता म्हणाली होती, ‘माझा चित्रपट जगताशी काहीही संबंध नव्हता. प्रवेश मिळवण्याचा माझा एकमेव मार्ग म्हणजे ऑडिशन. मी शिकत असताना काही काळ मॉडेलिंग करत होते. मॉडेल म्हणून तुम्ही जाहिरातींसाठी ऑडिशन देखील देता, पण मी स्वतःला तीन वर्षे दिली आणि मी ऑडिशन दिल्या. मी माझ्या आयुष्यात सुमारे 1000 एक ऑडिशन्स दिल्या असतील.’ अशा पद्धतीने तिला तिच्या रंगावरून रिजेक्शन मिळाल्याचं तिने सांगितलं.
बॉलिवूड ते हॉलिवूड प्रवास
2019 मध्ये अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या ‘मेड इन हेवन’ या वेब सिरीजमुळे शोभिता धुलिपाला प्रसिद्ध झाली. त्यानंतर शोभिता ‘मेजर’, ‘पोन्नियिन सेल्वन 1 आणि 2’, ‘मेजर’ आणि ‘द नाईट मॅनेजर’ सारख्या चित्रपटांमध्ये आणि शोमध्ये दिसली आहे. शोभिता धुलिपालाने हॉलिवूड चित्रपट ‘मंकी मॅन’ मध्येही काम केलं आहे जो गेल्या वर्षी अमेरिकेत प्रदर्शित झाला. पण अद्याप भारतात प्रदर्शित झालेला नाही.
तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर शोभिताने डिसेंबर 2024 मध्ये सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यशी लग्न केलं आणि अक्किनेनी-दग्गुबती कुटुंबाचा भाग बनली. हे नागा चैतन्यचे दुसरे लग्न आहे. त्याने यापूर्वी समांथा रुथ प्रभूशी लग्न केलं होतं. नागा चैतन्यशी लग्न झाल्यानंतर समांथाच्या चाहत्यांनी शोभितावर ‘घर तोडणारी’ असा टॅगही लावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List