चर्चमध्ये मुलींना एकटं केबिनमध्ये बसवून…; ‘मेरा येशु येशु’ फेम पाद्री बजिंदर सिंग विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार
कपूरथला येथील ‘मेरा येशु येशु’ फेम पाद्री बजिंदर सिंग विरोधात लैंगिक शोषणाची तक्रार करण्यात आली आहे. एका महिलेने पाद्रीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. महिलेच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी बजिंदर सिंहवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम 354 अ (लैंगिक छळ), 354 डी आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच राष्ट्रीय महिला आयोगाने (NCW)पाद्री बजिंदर सिंगला अटक करण्याचे आदेश दिले आहेत.
राष्ट्रीय महिला आयोगाने एक्स अकाऊंटवर यासंबंधीत एक पोस्ट शेअर केली आहे. ‘अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या निर्देशानुसार, NCW ने पंजाबमधील जालंधर येथे लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केलेल्या पास्टर बजिंदर सिंग यांच्यावरील मीडिया रिपोर्ट्सची स्वतःहून दखल घेतली आहे’ या आशयाची पोस्ट केली आहे. महिला आयोगाने अधिकाऱ्यांना भारतीय न्याय संहितेच्या (बीएनएस) संबंधित कलमांखाली बजिंदर सिंहविरुद्ध त्वरित आणि कडक कारवाई करण्याचे आणि पीडितेला संरक्षण देण्याचे आवाहन केले.
तक्रारदार महिलेने यापूर्वी म्हटले होते की तिच्यावर तिचे विधान मागे घेण्यासाठी दबाव आणला जात होता. स्वयंघोषित धर्मगुरूच्या समर्थकांनी पीडितेने खोटे विधान दिले आहे आणि तो निर्दोष आहे असा दावा करत मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. या प्रकरणात काय घडले हे अधिक जाणून घेण्यासाठी एनसीडब्ल्यूने ३ दिवसांत कारवाई अहवाल (एटीआर) आणि प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) मागितला आहे.
नेमकं प्रकरण काय?
कपूरथला येथील रहिवासी महिलेने सांगितले की पाद्री बजिंदर सिंह जालंधर येथील ताजपुर गावात चर्च ऑफ ग्लोरी एंड विस्डम नावाने ख्रिश्चन सत्संग करतो. पीडितेने आरोप केला आहे की, बजिंदर सिंह तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा आणि विचित्र प्रकारे मेसेज करायचा. पीडित महिलेने पोलिसांना सांगितले की, ती १७ वर्षांची असल्यापासून बजिंदर सिंह तिचे शोषण करत होता. त्यानंतर २०२२मध्ये एका रविवारी त्याने चर्चमध्ये एकटीला बोलावले आणि केबिनमध्ये एकटे बसवण्यास सुरुवात केली. बजिंदर सिंह केबिनमध्ये यायचा आणि अयोग्य पद्धतीने स्पर्श करायचा. त्यामुळे ती खूप घाबरली होती. तसेच तिला घाबरण्यासाठी यासगळ्यामुळे तुझा आणि कुटुंबीयांचा जीव जाईल अशी भीती घातली.
यापूर्वी देखील तक्रार करण्यात आली होती
बजिंदर सिंहवर यापूर्वी देखील अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. २०१८मध्ये बजिंदर सिंहला एका बलात्कार प्रकरणात अटक झाली होती.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List