चॅम्पियन्सवर कोटींचा पाऊस, ‘बीसीसीआय’कडून ‘टीम इंडिया’ला 58 कोटींचे बक्षीस जाहीर
रोहित शर्माच्या ‘टीम इंडिया’ने अंतिम लढतीत न्यूझीलंडचा पराभव करून कारकीर्दीत सर्वाधिक तिसऱयांदा चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. हिंदुस्थानी संघाच्या या ऐतिहासिक विजेतेपदाबद्दल ‘बीसीसीआय’ने गुरुवारी ‘टीम इंडिया’ला तब्बल 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले. विक्रमी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याचा पराक्रम केल्याबद्दल ‘बीसीसीआय’ने सढळ हाताने ‘टीम इंडिया’वर धनवर्षाव केला.
हिंदुस्थानी संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीत आपल्या लौकिकास साजेशी करताना संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य राहत विजेतेपदावर मोहर उमटवली. विराट कोहली, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे खेळाडू खऱ्या अर्थाने हिंदुस्थानच्या जेतेपदाचे शिल्पकार ठरले. कर्णधार रोहित शर्मानेही अंतिम सामन्यात मॅचविनिंग खेळी करीत चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या या कामगिरीचे कौतुक करताना बीसीसीआयने खेळाडू आणि कोचिंग स्टाफसह स्पर्धेशी संबंधित सर्व संघ सदस्यांना एकूण 58 कोटी रुपयांची बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे.
बीसीसीआयने बक्षिसाबाबत जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘यंदाच्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील विजयानंतर ‘टीम इंडिया’साठी 58 कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करताना बीसीसीआयला आनंद होत आहे. खेळाडू, प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ आणि निवड समितीच्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे.’
आधी 125 कोटी आता 58 कोटी
गेल्या वर्षी हिंदुस्थानी संघाने तब्बल 17 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर टी-20चा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळीही बीसीसीआयने ‘टीम इंडिया’चे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी आपली तिजोरी उघडली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघासाठी बोर्डाने तेव्हा 125 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ही बक्षिसाची रक्कम सर्व खेळाडू, निवडकर्ते, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफमध्ये वाटण्यात आली. आता ‘बीसीसीआय’ने चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या हिंदुस्थानी संघाला 58 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले असून या बक्षिसाची रक्कमही सर्व खेळाडू, निवडकर्ते, प्रशिक्षक आणि सपोर्टिंग स्टाफमध्ये वाटण्यात येणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List