तब्बल ८५ वर्षांनंतर राज्य परिवहन विभागाला कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा, पाहा काय घडामोडी
महाराष्ट्र राज्याची निर्मिती १ मे, १९६० रोजी झाली असली तरी रस्ते वाहतूकीचे नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० रोजी तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला होता. त्यामुळे १ मार्च हा दिवस परिवहन दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधून राज्याच्या परिवहन विभागाला तब्बल ८५ वर्षानंतर स्वत:चे हक्काचे कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचा परिवहन विभाग राज्याच्या तिजोरीत दरवर्षी १५ हजार कोटी रुपयांचा महसूल मिळवून देत असतो. पण त्याला स्वत:चे कार्यालय नव्हते. सध्या परिवहन आयुक्त कार्यालय काळा घोडा येथील व्हीएसएनएल इमारतीच्या शेजारील एमटीएनएल इमारतीत आहे. आता नवीन कार्यालय वरळी येथील सरपोचखाना मार्गावर उभारले जाणार आहे.
राज्य परिवहन विभागाचा ( RTO ) गाडा फोर्ट येथील एमटीएनएलच्या इमारतीतील भाड्याच्या जागेतून हाकला जातो. या राज्य परिवहन विभागाला या भाड्याच्या जागेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वाहनांना पार्कींग नसल्याने परिवहन विभागाच्या जागा रस्त्यावर बेकायदेशीर पार्क कराव्या लागत होत्या. तसेच या इमारतीत तत्कालीन परिवहन आयुक्त अडकले होते. त्यामुळे परिवहन आयुक्तांचे कार्यालय या इमारतीतून अन्यत्र हलविण्याची मागणी अनेक वर्षे होत होती. आता परिवहन विभागाला नवीन जागा मिळाली असून त्यावर भव्य असे परिवहन आयुक्तांच्या कार्यालय उभारले जाणार आहे.
रविवार २ मार्च रोजी फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
‘परिवहन भवन’ या नव्या इमारतीचे भूमीपूजन येत्या २ मार्च रोजी दुपारी २ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे अन्य मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. रस्ते वाहतुकीची नियमन करण्यासाठी १ मार्च १९४० ला तत्कालीन मुंबई राज्याचा परिवहन विभाग अस्तित्वात आला होता. त्यामुळे १ मार्च हा दिवस “परिवहन दिन” म्हणून साजरा केला जातो. या दिवसाची औचित्य साधून या रविवारी वरळी येथील सर पोचखानवाला मार्गावर ४ मजली प्रशस्त अशा “परिवहन भवन” या इमारतीचे बांधकाम सुरु होणार आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे.सुमारे १२८०० चौरस मीटर बांधकाम क्षेत्र असलेल्या या इमारतीमध्ये एकावेळी १५० चारचाकी वाहने उभी करता येतील, इतकी चार मजल्याची भूमिगत पार्किंग व्यवस्था निर्माण करण्यात येणार आहे. ही इमारत पुढील अडीच वर्षांत बांधून पूर्ण केली जाणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List