पतीच्या हत्येसाठी पत्नीकडून जादूटोणा, प्रियकरासोबत मिळून काढला काटा
हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ खूनप्रकरणी 1 हजार पानांचे दोषारोपपत्र पोलिसांनी लष्कर न्यायालयात दाखल केले आहे. मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून त्याने वाघ यांच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधातूनच खून केल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये वाघच्या पत्नीने जादूटोण्याचा प्रयोग केल्याचेही समोर आले आहे. अक्षय जावळकर, मोहिनी वाघ, अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे, विकास शिंदे यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले आहे.
हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हे 9 डिसेंबर 2024 रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात होते. त्यावेळी टोळक्याने त्यांचे मोटारीतून अपहरण करून त्यांच्यावर 72 वार करीत खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह शिंदवणे घाटात फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून आरोपींचा पर्दाफाश केला आहे. मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू होता. त्यानंतर 2023 पासून अक्षय व मोहिनी यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. 2017 मध्ये सतीशला मोहिनी व अक्षय यांच्याबाबत संशय आला. त्यानंतर अक्षयला घर सोडायला भाग पाडल्यानंतरही त्याचे अनैतिक संबंध होते.
त्रासामुळे मोहिनीने प्रियकर अक्षयला सतीशचा काटा काढायला सांगितले होते. सतीशचा खून करण्यासाठी दोघांनी एक वर्षांपासून नियोजन केले होते. घरात भेटता येत नाही म्हणून ते लॉजवर भेटत होते. खून करण्यापूर्वी मोहिनीने एका मांत्रिक महिलेची मदत घेतली. तिने सतीशच्या खुनासाठी अक्षयला 5 लाखांची सुपारी दिली. त्यानंतर अक्षयने हल्लेखोर शर्माला दीड लाख रुपये अॅडव्हान्स दिला. सतीशचा पाय तोडून जागेवर बसवायचे किंवा खुनाचा डाव त्यांनी रचला. पतीचा खून झाल्यानंतर हॉटेल, खोल्यांचे उत्पन्न मोहिनीला मिळणार होते. गुन्ह्यातील न्यायवैद्यकीय पुरावे, आरोपी, फिर्यादी, साक्षीदारांचे जबाब नोंदविले आहेत. पोलिसांनी सतीशचा मोबाईल, मोटार, हत्यारे जप्त केली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाने दोषारोपपत्र दाखल केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List