सामना अग्रलेख – कश्मीरचा राग पुराना!

सामना अग्रलेख – कश्मीरचा राग पुराना!

भारत सरकार मणिपूरचा प्रश्न सोडवू शकले नाही. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढू शकले नाही. अमेरिका भारतीय घुसखोरांना हातापायांत बेड्या जखडून परत पाठवत आहे. प्रे. ट्रम्पसमोर हा प्रश्न आपण मांडू शकलो नाही व भारतीयांचा अपमान थांबवू शकलो नाही आणि जयशंकर निघाले आहेत पाकच्या ताब्यातील कश्मीर परत आणायला! त्याचे स्वागतच आहे. लंडन येथे खलिस्तानी समर्थकांनी जयशंकर यांच्या ताफ्यात घुसून निदर्शने केली. भारतविरोधी घोषणा दिल्या. भारतात फुटीरतावाद्यांचे शेपूट पुन्हा वळवळू लागले आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कश्मीरचा राग चालूच राहील!

पाकव्याप्त कश्मीर घेतल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही आणि त्याशिवाय कश्मीरचा प्रश्न सुटणार नाही, असे विधान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केले आहे. लंडन येथील पत्रकार परिषदेत एका पाकिस्तानी पत्रकाराने जयशंकर यांना पाकिस्तानविषयी प्रश्न विचारला व जयशंकर यांनी ‘संघ’छाप उत्तर दिले. जयशंकर हे भारतीय परराष्ट्र सेवेतले एक निवृत्त नोकरशहा आहेत. मोदी यांनी त्यांना सुषमा स्वराज यांच्या जागी परराष्ट्रमंत्री केले, पण जयशंकर म्हणजे डॉ. मनमोहन सिंग नाहीत. मनमोहन सिंग यांनी देशात अर्थक्रांती घडवली तसे क्रांतिकारक काम जयशंकर यांनी परराष्ट्र खात्यात केले नाही. डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारखे लोक जयशंकर यांची खिल्ली उडवतात. जयशंकर म्हणतात, ‘‘पाकच्या ताब्यातील कश्मीरचा भूभाग घेऊ.’’ जयशंकर व त्यांच्या पक्षाला पाकच्या ताब्यातील कश्मीर घेण्यापासून कोणीच अडवलेले नाही. मोदी यांचे सरकार येऊन दहा वर्षे झाली व मोदींसारख्या नेत्यांना कश्मीर ताब्यात घ्यायला हा एवढा काळ पुरेसा आहे. कश्मीर ताब्यात घेऊ आणि अखंड भारत बनवू. त्यासाठी पाकड्यांच्या हद्दीत घुसून त्यांना मारू, अशा गर्जना पंतप्रधान मोदी यांनी अनेकदा केल्या. त्या गर्जना शेवटी वल्गनाच ठरल्या. कश्मीरात मोदी यांनी विशेष असे काहीच केले नाही. भारत-पाकिस्तानमधील तणावाचे मुख्य कारण पाकव्याप्त कश्मीर हेच आहे. हा तणाव दूर होण्यासाठी कश्मीरचा प्रश्न निकाली काढावा लागेल, पण कश्मीरचा भूभाग सोडायला कोणी तयार नाही. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कश्मीरात जाऊन भारतीय सैन्यासमोर भाषण करतात. त्यातही ते पाकव्याप्त कश्मीर हा भारताचाच भाग असून तो परत घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, हेच

पालुपद

लावत असतात. मोदी-राजनाथ-जयशंकर यांनी एकत्र बसून पाकव्याप्त कश्मीर पुन्हा भारतात घेण्याविषयीचा एक आराखडा व कालमर्यादा आखली पाहिजे. पुढच्या दोन वर्षांत आम्ही पाकमध्ये घुसून कश्मीरवर तिरंगा फडकवू असे जाहीर केले पाहिजे. मोदी ते का करत नाहीत? कश्मीरच्या नावाने आणखी किती काळ नरडी गरम करणार? याप्रश्नी लोकांना मूर्ख बनविण्याचे राजकारण कधीतरी थांबायला हवे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोकही कश्मीरप्रश्नी भूमिका मांडतात व पाकिस्तान संपूर्णपणे भारताला जोडून घेणारच असे सांगतात. ते ऐकून कोणत्याही भारतीयाचा ऊर भरून आल्याशिवाय राहत नाही. कारण फाळणीचा घाव हा आजही भळभळतो आहे. पाकिस्तान हा धर्माच्या आधारे निर्माण केला गेला. अर्थात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. त्यामुळे हे लोक कुंपणावर बसून टीकाटिपण्या करत राहतात. देश स्वतंत्र झाल्यावर या लोकांनी स्वातंत्र्य सोहळ्यात भाग घेतला नाही व आपल्या नागपूरच्या कार्यालयावर तिरंगा फडकवला नाही. हे लोक कश्मीर ताब्यात घेण्याचे आव्हान स्वीकारीत असतील तर त्यांचे स्वागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ‘फौज’ ही भारतीय सैन्यापेक्षा भारी असल्याचे मत सरसंघचालकांनी व्यक्त केलेच होते. या फौजांनी पाकव्याप्त कश्मीरात घुसून जलालाबाद, बलुचिस्तान वगैरे भागांवर ‘अटकेपार’ झेंडे फडकवले तर संपूर्ण देश त्यांचा गौरव करेल. मोदी यांच्या विजयात संघाचा वाटा आहे. तीच तडफ संघाने कश्मीरच्या बाबतीत दाखवायला नको काय? लंडन मुक्कामी पाकिस्तानी पत्रकार निसार यांनी जयशंकर यांना विचारले की, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबतचे संबंध वापरून

कश्मीरचा प्रश्न

सोडविण्याचा प्रयत्न करू शकतात का?’’ यावर जयशंकर यांनी ‘‘पाकने कश्मीरचा ताबा सोडावा, प्रश्न मिटेल,’’ असे सांगितले. पाकिस्तानबरोबर भारताने दोन युद्धे केली, पण कश्मीरचा प्रश्न तसाच आहे. निवडणुका आल्या की, मोदी व संघाचे लोक कश्मीरचा राग आळवतात. निवडणुका संपल्या की, त्यांचा घसा खराब होतो. कश्मीरातून 370 कलम काढले. कश्मीर या राज्याचा दर्जा काढून घेतला. मात्र या गोष्टींमुळे कश्मीरचा प्रश्न सुटेल ही बनवाबनवी आहे. कश्मीरात ‘पंडितां’चा प्रश्न मोदी सरकार सोडवू शकलेले नाही. पंडित आपल्या घरी परत जाऊ शकत नाहीत आणि भाजपवाले पाकव्याप्त कश्मीरात घुसून मारण्याची वल्गना करतात. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी तर लंडन येथे असा ताव मारला की, पाकच्या ताब्यातील कश्मीरचा प्रश्न भारत चुटकीसरशी सोडवेल. जयशंकर यांनी आधी चीनने भारताचा जो भूभाग गिळला आहे, त्यावर भाष्य केले पाहिजे. चिनी लाल फौजांपुढे गुडघे टेकायचे व पाकिस्तानवर बोलत राहायचे, ही कुठली नीती? कश्मीरमध्ये दहशतवाद सुरूच आहे. फक्त त्या बातम्यांच्या प्रसिद्धीवर बंधने आहेत. भारत सरकार मणिपूरचा प्रश्न सोडवू शकले नाही. बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढू शकले नाही. अमेरिका भारतीय घुसखोरांना हातापायांत बेड्या जखडून परत पाठवत आहे.

प्रे. ट्रम्पसमोर हा प्रश्न आपण मांडू शकलो नाही व भारतीयांचा अपमान थांबवू शकलो नाही आणि जयशंकर निघाले आहेत पाकच्या ताब्यातील कश्मीर परत आणायला! त्याचे स्वागतच आहे. लंडन येथे खलिस्तानी समर्थकांनी जयशंकर यांच्या ताफ्यात घुसून निदर्शने केली. भारतविरोधी घोषणा दिल्या. भारतात फुटीरतावाद्यांचे शेपूट पुन्हा वळवळू लागले आहे. त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. कश्मीरचा राग चालूच राहील!

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर तीन वर्षांत सहा लाख कर्मचाऱ्यांची नोकरी गेली! कंपन्यांची खर्चकपात कर्मचाऱ्यांच्या पोटावर
कंपन्यांनी खर्च कमी करण्याच्या नावाखाली गेल्या तीन वर्षांत जवळपास 5.8 लाख कर्मचाऱ्यांना कामांवरून काढून टाकले आहे. 2023 मध्ये कंपन्यांनी 2...
हे कोर्टरूम आहे, सिनेमा हॉल नाही! सुनावणीसाठी थेट शौचालयातून उपस्थित राहणाऱ्या आरोपीला कोर्टाने झापले 
वैष्णोदेवी दर्शनासाठी आता थेट फ्लाईट
हिंदुस्थान-फ्रान्स नौदलाचा अभ्यास
धक्कादायक! ओडिशात रोज 3 बालविवाह
नौदलात 29 मार्चपासून अग्निवीर पदांची भरती
कुवेतमध्ये 42 हजार जणांचे नागरिकत्व धोक्यात