शांततेसाठी अमेरिका, युक्रेनची पहिली चर्चा सौदी अरेबियात; युद्ध संपवण्यासाठी उचलले पहिले पाऊल
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी युद्ध संपवण्यासाठी शांतता चर्चेला सहमती दर्शवली असून अमेरिकेसोबत शांतता चर्चेची पहिली बैठक सौदी अरेबियात घेण्यात येणार आहे. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात वॉशिंग्टनच्या ओव्हल ऑफिसमध्ये झालेली बैठक अयशस्वी ठरली होती आणि दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद झाला होता. मात्र, आता झेलेन्स्की यांनीच शांतता चर्चेला सहमती दर्शवून नवा मार्ग खुला केला आहे. दरम्यान, रशियाकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दोनच दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी म्हटले होते.
अमेरिकेचे शिष्टमंडळ शांतता प्रस्थापित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यावर विचार करत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ट्रम्प यांना पत्र लिहून संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली असून माफीही मागितली आहे, असा दावा ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ यांनी केला. तसेच अमेरिका आणि युक्रेनमधील संबंध लवकरच सामान्य होतील आणि वाटाघाटीही पुन्हा सुरू होतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, युद्धाचे कारण केवळ रशियाच असून जागभरातील नेत्यांनी त्यांच्यावर संघर्ष संपवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहनही झेलेन्स्की यांनी केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List