Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना सरकारचं डबल गिफ्ट, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी मोठी बातमी
ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या जुलै महिन्यापासून ही योजना सुरू झाली आहे. आतापर्यंत महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे एकूण सात हाफ्ते जमा झाले आहेत. मात्र फेब्रुवारी उलटून गेला तरी देखील अद्याप आठवा हाफ्ता लाभार्थी महिलांना मिळालेला नाहीये. तसेच जर आमचं सरकार आलं तर आम्ही लाडकी बहीण योजनेच्या हाफ्त्यामध्ये वाढ करून महिलांना दर महिन्याला 2100 रुपये देऊ अशी घोषणा सत्तेत येण्यापूर्वी महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्यामुळे आता फेब्रुवारीचा हाफ्ता बँक खात्यात कधी जमा होणार? आणि 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे.
लाडकी बहिण योजनेबाबत आता एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे फेब्रुवारी संपून मार्च महिना लागला मात्र अजूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत. मात्र लाभार्थी महिलांना दिलासा देणारी बातमी आहे, ती म्हणजे येत्या 7 मार्चपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार आणि मार्च महिन्याचे दीड हजार असे एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहेत. सरकारकडून या महिन्यात लाभार्थी महिलांना डबल गिफ्ट मिळणार आहे. याबाबत मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
नेमकं काय म्हणाल्या तटकरे?
‘लाडक्या बहिणींना महिला दिनाची भेट ! महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा लाभ दिला जाणार आहे. ७ मार्च २०२५ पर्यंत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन महिन्यांचा सन्मान निधी ३००० रुपये जमा करण्यात येईल’ असं ट्विट आदिती तटकरे यांनी केलं आहे.
2100 रुपये कधीपासून मिळणार
दरम्यान सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर महिलांना दर महिन्याला 2100 रुपये मिळू शकतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List