संजय राऊतांमुळे आनंद दिघेंना टाडा लागला, त्यांनी साहेबांना हार घालू नये… शिंदे गटातील बड्या नेत्याचा दावा
खोपकर हत्याकांडा नंतर संजय राऊत यांनी लोकप्रभामध्ये एक लेख लिहिला होता. त्या लेखामुळे आनंद दिघे यांना टाडा लागला. त्यांना तुरुंगात जावे लागले. आता त्या संजय राऊत यांनी दिघे साहेबांना हार घालायची भाषा करू नये. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाला आनंद दिघे यांचे नाव देण्याला विरोध करणाऱ्यांनी दिघे साहेबांचा पुतळ्याला पुष्पमाळ घालायची भाषा करू नये, अशा इशारा शिंदे गटाचे नेते आणि खासदार नरेश म्हस्के यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील शिवसेना ठाकरे गटाचा पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. त्यावेळी संजय राऊत आनंद दीघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी जाणार होते. त्यावर नरेश म्हस्के यांनी टीका केली.
स्वप्नातही एकनाथ शिंदे दिसतात…
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नरेंद्र म्हस्के म्हणाले, महाभारतात धृतराष्ट्र यांच्या जोडीला संजय होते. त्यांना दिव्यदृष्टी होती. हे संजय जर स्वतःला संजय समजत असतील तर त्यांनी जनतेच्या मनात काय आहे, त्याचाच विचार करावा. ते रात्रीच भांडुपच्या हातभट्टीची घेतात. त्यामुळे त्यांना स्वप्नातही एकनाथ शिंदे दिसतात. रात्रीची उतरली नसेल म्हणून सकाळी ते एकनाथ शिंदे यांच्याबाबत बोलले असतील. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जो पक्ष आहे, ती शिल्लक सेना आहे. ही सेना त्यांनी सोनिया गांधींकडे गहाण ठेवली आहे. बाळासाहेबांचा हिंदुत्ववादी पक्ष सोनिया गांधींकडे गहाण ठेवला होता, तो एकनाथ शिंदे यांनी सोडवला.
सावरकर यांची शपथ घेणाऱ्यांना मला एक सांगायचे आहे ज्यांनी सावकारांबद्दल अपशब्द वापरले, त्यांना शिव्यांची लाखोली वाहिली त्या राहुल गांधी यांचे कपडे धुण्याचे काम तुम्ही का करत आहात? असा सवाल नरेश म्हस्के यांनी उपस्थित केला. शिवसेना उबाठाची अवस्था बिकट आहे. त्यांच्याकडचे नगरसेवकसुद्धा आता पक्ष सोडून जात आहेत. यामुळे ठाण्यामध्ये १०० ते १५० माणसे बसतील एवढ्याच हॉलमध्ये त्यांना मेळावा घ्यावा लागत आहेत, असे खासदार म्हस्के यांनी म्हटले.
लोकसभेला त्यांनी आव्हान केले होते दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण ठाण्यातील जनता ठरवेल. मग निवडणुकीत ते ठाण्यातीत जनतेने दाखवून दिले आहे. त्यापूर्वी विधानसभेतही दाखवून दिले होते. ठाण्यातील जनता एकनाथ शिंदे यांच्या मागे आहे. जनतेने तुमची पात्रता आणि योग्यता लोकसभा आणि विधानसभेत दाखवून दिली, असा टोला नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List