फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय म्हणा; राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सूचना

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा सांगलीत मेळावा झाला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत हा मेळावा झाला. या मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोलायचं, असे म्हटले. आता येथून पुढे फोन लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असेही शिंदे यांनी म्हटले.
प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे, रोहित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगलीत राष्ट्रवादीचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. कोणताही फोन आला तर सुरुवातीला जय शिवराय म्हणायचं, सांगली जिल्ह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला. आता आपल्याला पुन्हा नव्या उमेदीने उभे राहावे लागणार आहे. एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्याच्या घोषणा केल्या जातात आणि दुसरीकडे मात्र धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आगामी काळात तालुकास्तरावर मेळावे घेतले जातील. जो कार्यकर्ता सक्षम आहे, त्याच्याकडे पक्षाची जबाबदारी देण्यात येईल. तसेच जो पक्षात येण्यास इच्छुक आहे, त्याला देखील जबाबदारी देण्याचा विचार होईल, असेही शिंदे यांनी म्हटले.
हल्ली तरुणांना भावनिकतेच्या मुद्द्यावर दुसरीकडे नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व शासकीय कार्यालयातील रिक्त पदांच्या जागेवर स्थानिक तरुणांचा हक्क असल्याचं जाणून दिलं पाहिजे. सरकार शासकीय कार्यालयामध्ये आता कॉन्ट्रॅक्ट सिस्टीम करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यासाठी आता आंदोलन उभारण्याची गरज आहे. जिल्ह्यातील शंभर कार्यकर्त्यांची फौज अशी तयार ठेवा की राज्यात कोणताही मुद्दा उपस्थित झाला तर त्याची सुरुवात आंदोलनातून, सांगलीतून झाली पाहिजे. ज्या योजना बंद होत आहेत, त्या योजनेचे लाभार्थी शोधा व त्यांना सरकार अन्याय कसं करत आहे हे पटवून द्या, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List