‘छावा’ सिनेमातील तो सीन पाहून चाहत्याला राग अनावर, फाडली थिएटरमधली स्क्रीन
सध्या सगळीकडे एकाच सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. तो म्हणजे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ सिनेमा. या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल आणि दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री रश्मिका मंदाना महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, चित्रपटात दाखवण्यात आलेला एक सीन पाहून चाहत्याला राग अनावर झाला. या चाहत्याने रागाच्या भरात थिएटरमधील स्क्रीन फाडून टाकली आहे.
गुजरातमधील भरूच डिव्हिजन पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भरूच येथील आरके चित्रपटगृहामध्ये रात्री ११ वाजून ४५ मिनिटांनी सुरू असलेल्या ‘छावा’ सिनेमाच्या स्क्रीनिंगच्या वेळी ही घटना घटली. चित्रपट सुरू असताना एक सीन पाहून मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चाहत्याला राग अनावर झाला. त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने स्क्रीन फाडली. त्यानंतर थिएटरमधील कर्मचारी तेथे पोहोचले आणि त्यांनी चाहत्याला बाहेर काढले. या चाहत्याचे नाव जयेश वासवा असे आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘छावा’ सिनेमात फेब्रुवारी १६८९ मध्ये संगमेश्वर येथे औरंगजेबाने कैद केलेल्या संभाजीराजे महाराजांच्या शिरच्छेदाचा सीन दाखवण्यात आला आहे. हा सीन पाहून जयेश वासवाला राग अनावर झाला. संभाजी महाराजांना औरंगजेब मारत असल्याचे पाहून तो स्क्रीनच्या दिशेने धावला. त्याने अग्निशामक यंत्राच्या मदतीने औरंगजेबावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या या प्रयत्नाने थिएटरमधील स्क्रीन फाटली. त्यानंतर तातडीने जयेशला थिएटर बाहेर काढण्यात आले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
आरके सिनेमाचे जनरल मॅनेजर आरव्ही सूद याविषयी बोलताना म्हणाले, “ब्लूचिप सिनेमाच्या कर्मचाऱ्यांकडून मला फोन आला की एका ग्राहकाने अग्निशामक यंत्राने स्क्रीन फाडली आहे. त्याला तातडीने बाहेर काढण्याचे आदेश मी दिले. जेणेकरून इतर कोणतेही नुकसान होणार नाही. त्यानंतर मी पोलीसांना फोन केला.” चाहत्याच्या या कृत्यामुळे थिएटर मालकाचे जवळपास १.५ लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. रविवारी रात्री जे लोक हा शो पाहत होते त्यांना शेजारच्या स्क्रीनवर चित्रपट पाहण्याची ऑफर देण्यात आली होती. तसेच काहींना त्यांचे पैसे परत करण्यात आले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List