दुचाकीस्वार साखळी चोरट्यांचा धुमाकूळ, भवानी पेठ, वारजे, चतुः शृंगी भागात दागिने हिसकावण्याच्या घटना
पुणे शहरातील विविध भागांत दुचाकीस्वार चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पादचारी ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटनांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे दागिने हिसकाविण्याच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असताना, पोलिसांनी मात्र दुचाकीस्वार चोरट्यांपुढे हात टेकल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी ज्येष्ठ महिलांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने हिसकावून नेले. गजबजलेल्या भवानी पेठ, एरंडवणे, वारजे, चतुःशृंगी भागात ज्येष्ठ महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटना घडल्या आहेत.
भवानी पेठेतील लोखंड बाजारात पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर चौकात राहायला आहे. शनिवारी (15 फेब्रुवारी) त्या रात्री साडेनऊच्या सुमारास पतीसोबत भवानी पेठेतील लोखंड बाजारातून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दीड लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार तपास करीत आहेत.
रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 50 हजारांची सोनसाखळी चोरट्यांनी हिसकावण्याची घटना रविवारी (16 फेब्रुवारी) रात्री आठच्या सुमारास एरंडवणे भागातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय परिसरात घडली. याबाबत ज्येष्ठ महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला पुणे-सातारा रस्त्यावरील बालाजीनगर भागात राहायला आहेत. रविवारी रात्री आठच्या सुमारास त्या एरंडवणे भागातील सेवासदन शाळेसमोर रिक्षाची वाट पाहत थांबल्या होत्या. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून नेली. पोलीस उपनिरीक्षक महेश निंबाळकर तपास करीत आहेत. वारजे भागात रविवारी सायंकाळी ज्येष्ठ महिलेचे दीड लाखांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी लांबवले. औंध परिसरात ज्येष्ठ महिलेची दीड लाखांची सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला मरगळ
■ दुचाकीस्वार चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाही, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांना मरगळ आली आहे. दिवसेंदिवस लुटमारीच्या घटनांचा आलेख वाढत असतानाही पोलीस सुस्त असल्याचे दिसून आले आहे. दुचाकीस्वार चोरटे शिरजोर झाले असून, पोलिसांनी हात टेकल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांचा विविध पथकांवरील वचक कमी झाल्यामुळेच गुन्हेगारांचे फावले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List