सायबर चोरट्यांचा धुमाकूळ सुरुच, झटपट श्रीमंत होणे पडतेय महागात; उच्चशिक्षितच पडताहेत बळी
कमी श्रमात झटपट श्रीमंत होण्याचा मोह सर्वांनाच असतो. त्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो. ही मानसिकता विचारात घेऊन सायबर चोरटे वेगवेगळ्या आमिषाने गंडा घालत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक झालेल्यांमध्ये डॉक्टर, इंजिनिअर यांच्यासह उच्चशिक्षितांची संख्या सर्वाधिक आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक, टास्क पूर्ण करण्याच्या बहाण्याबरोबरच वेगवेगळ्या बतावण्या करून सायबर चोरटे सर्वांची लूट करत आहेत. रोज हे गुन्हे घडत असले तरी जास्त पैशांच्या मोहापोटी नागरिक त्याकडे दुर्लक्ष करतात. सुरुवातीला काही रक्कम देण्यात येते. त्यामुळे नागरिकांचा या भामट्यांवर विश्वास बसतो. हे भामटे सांगतील तेथे वारंवार रक्कम जमा केली जाते. लाखो रुपये उकळल्यानंतर हे भामटे गायब होतात. त्यामुळे सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र, तरीही जास्त पैशाचा मोह सुटत नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मात्र सर्वजण पोलिसांकडे धाव घेतात. आधीच नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
विविध प्रकारची आमिषे दाखवून सायबर चोरट्यांनी अनेकांना आतापर्यंत लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. शहर, उपनगरच नव्हे; तर पुणे जिल्ह्यात सायबर क्राईमच्या क्रेडिट, डेबिट कार्ड, एटीएम फ्रॉड या गुन्ह्याचा आलेख सातत्याने उंचावत आहे. कर्ज, ऑनलाइन खरेदी-विक्री इन्शुरन्स, मनी ट्रान्स्फरबरोबरच फेक प्रोफाईल, फेसबुक हॅकिंग, बदनामीकारक मजकूर लिहिणे, अश्लील व्हिडीओ अपलोड करणे, फेक मेल तयार करून समाजात तेढ निर्माण होईल असे लिखाण ट्विट करणे आदी गुन्ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
शेअर बाजारात पैसे गुंतवल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष सायबर चोरट्यांनी दाखवल्यानंतर एका व्यक्तीने 46 लाख रुपये गुंतवले.
काही दिवसांत त्या 46 लाखांचे पावणेदोन कोटी रुपये झाले. अल्पावधीत लाखाचे कोटी रुपये झाल्याने संबंधित व्यक्ती आनंदित झाली होती. मात्र, शेअर ट्रेडिंग अॅपमधून पैसे काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर फसवणुकीची तक्रार दिली.
शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ताडीवाला रस्ता परिसरात राहणाऱ्या 36 वर्षीय तरुणाची 21 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.
वडगाव शेरी सोमनाथनगर येथील राहणाऱ्या 54 वर्षीय व्यक्तीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार नोकरी करतात. 13 डिसेंबरला त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यामध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत मार्गदर्शन केले जात होते. तक्रारदाराने सुमारे एक महिना त्या ग्रुपची पाहणी केली. त्यात अनेकांना नफा होत असल्याचे दिसत होते. त्यामुळे तक्रारदाराचाही त्यावर विश्वास बसला. त्यानंतर तक्रारदाराला आणखी एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले आणि वैयक्तिक मेसेज पाठवून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित केले.
डॉक्टरांनाही गंडा
■ पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेत असलेल्या डॉक्टर तरुणाची प्रीपेड टास्कच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी सव्वातीन लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी एका रास्ता पेठेतील एका वसतिगृहात राहणाऱ्या 26 वर्षीय डॉक्टर तरुणाने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List