बाळाला स्तनपान करणाऱ्या राधिका आपटेच्या हातात शॅम्पेनचा ग्लास पाहून भडकले नेटकरी
अभिनेत्री राधिका आपटेनं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सर्वांना गुड न्यूज दिली. लग्नाच्या बारा वर्षांनंतर राधिका आई बनली. तिने गोंडस मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतरही राधिकानं तिचं काम सुरू ठेवलं आहे. बाळाचं संगोपन करताना राधिका तिच्या कामाचा भारही उचलत आहे. नुकतीच तिने ‘ब्रिटीश अकॅडमी फिल्म अवॉर्ड्स 2025’ला हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात राधिकाच्या ‘सिस्टर मिडनाइट’ या चित्रपटाला नामांकन मिळालं होतं. या पुरस्कार सोहळ्यातील पडद्यामागचा एक फोटो राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. मात्र या फोटोमुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय.
बाळाला स्तनपान करणं गरजेचं असल्याने राधिकाने ब्रेस्ट पंपिंगचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे पुरस्कार सोहळ्यातून तिने ब्रेस्ट पंपिंगसाठी वेळ काढला आहे. हाच फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यामध्ये एकीकडे राधिका ब्रेस्ट पंपिंग करताना दिसत आहे, तर तिच्या दुसऱ्या हातात शॅम्पेनचा ग्लास पहायला मिळतोय. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘माझं ‘बाफ्ता’ला येणं शक्य केल्याबद्दल नताशाचे आभार. माझ्या ब्रेस्ट पंपिंगच्या वेळेनुसार तिने कार्यक्रमाचं नियोजन केलं. माझ्या ब्रेस्ट पंपिंगच्या वेळी ती केवळ माझ्यासोबत वॉशरुमलाच आली नाही तर तिने माझ्यासाठी शॅम्पेनचा ग्लाससुद्धा आणला. नव्यानेच आई बनल्यानंतर काम करणं खूप अवघड होतं. आपल्या फिल्म इंडस्ट्रीत अशा प्रकारची काळजी आणि संवेदनशीलता पाहायला मिळणं खूप दुर्मिळ आहे. मी याचं खूप कौतुक करते.’
राधिकाच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘राधिका, यातून तू चुकीचा संदेश देत आहेस. शॅम्पेन पिताना ब्रेस्ट पंपिंग करणं खूप चुकीचं आहे. ते शॅम्पेन तुझ्या दुधात जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे ते दूध तू बाळाला पाजू शकत नाहीस. बाळासाठी हे खूप घातक आहे’, असं एकीने लिहिलं. तर ‘राधिका, तू खूप चांगली आहेस पण असं काही करू नकोस’, असं दुसऱ्या युजरने म्हटलंय.
बाळाला जेव्हा स्तनपान करणं शक्य नसतं तेव्हा अनेकदा ब्रेस्ट पंपिंगचा पर्याय निवडला जातो. याने बाळाला कोणत्याही वेळी आईचं दूध पाजणं शक्य होतं. मात्र स्तनपान करणाऱ्या आईला मद्यपान करणं नाकारलं जातं. बाळाच्या आरोग्यासाठी हे योग्य नसतं आणि म्हणूनच राधिकाला या फोटोमुळे ट्रोल केलं जातंय.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List