Uddhav Thackeray-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल.. आता तरी एकत्र या ! राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना कोणी दिली साद ?
शिवसेनेतून राज ठाकरे जेव्हा बाहेर पडले तेव्हा मोठा भूकंप झाला होता. पक्षातून बाहेर पडल्यावर त्यांनी मनसे अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी अनेक मराठी माणसांची इच्छा असून त्यासाठी त्यांना वेळोवेळी साद घातली जाते. हीच भावनिक साद आता पुन्हा घालण्यात आली असून ‘ठाकरे बंधूंनी एकत्र यावं’ अशा आशयाचे बॅनर्स शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर राज आणि उद्धव ठाकरे यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असलेला एकत्रित फोटोही लावण्यात आला आहे. मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असा उल्लेखही या बॅनरवर करण्यात आला आहे. महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावी अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे आता ठाकरे बंधूंचे पुन्हा मनोमिलन होऊन ते एकत्र येणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल.
ठाकरे बंधूंना भावनिक साद
शिवसेना भवनच्या समोरच या आशयाचे बॅनर लागले आहेत. उद्धव ठाकरे,मध्यभागी बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या बाजूला राज ठाकरे या तिघांचा एकत्रित असा हा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. ” महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. मराठी माणूस द्विधा मनस्थितीत आहे. राजसाहेब ठाकरे आणि उद्धव साहेब ठाकरे आता तरी आता तरी एकत्र या, मराठी माणूस आपली वाट पहात आहे ” अशा आशयाचे हे बॅनर सध्या लागलेले दिसत आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे अनेकदा कौटुंबिक कार्यक्रमात एकत्र पहायाला मिळाले आहेत, त्यांनी पुन्हा एकत्र यावं अशी विधानं सामान्य माणसांपासून, अनेक कार्यकर्ते, काही नेत्यांनीही आत्तापर्यंत केली आहेत, त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. पण राज किंवा उद्धव ठाकरे , यांच्यापैकी कोणीही किंवा शिवेसना- मनसेकडून एकत्र येण्याबाबतची कोणतीही घोषणा आत्तापर्यंत करण्यात आलेली नाही. मात्र शिवसेना भवनासमोर पुन्हा लागलेल्या या बॅनरने संपूर्ण मुंबईचं नव्हे तर राज्याचं लक्ष वेधून घेतलं असून राज आणि उद्धव यांचे मनोमिलन होते का, त्यांची युती होते का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. ते पुढे काय भूमिका मांडतात याकडेही अनेकांचं लक्ष असेल.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात अनेक वर्षांपासून मतभेद आहेत. राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाने नव्या पक्षाची स्थापना केली, त्या पक्षाला राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज ठाकरे यांचा झंझावात राज्यभरात बघायला मिळाला होता. त्यामुळे पहिल्याच विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या पक्षाचे तब्बल 13 आमदार निवडून आले होते. पण नंतर गोष्टी बदलत गेल्या. असं असलं तरीही एकदा उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली होती तेव्हा राज ठाकरे त्यांच्या भेटीला गेले होते. उद्धव ठाकरेंना डिस्चार्ज मिळाला तेव्हा राज ठाकरे यांनी कार चालवत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. पण हे दोन्ही बंधू अनेक वर्षांपासून राजकारणात एकत्र आलेले बघायला मिळाले नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List