भगवे वस्त्र, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा अन्… ममता कुलकर्णीने घेतला संन्यास, साध्वी बनत नावात केला मोठा बदल
Mamta Kulkarni Become Sadhvi : नव्वदीच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीने तिच्या सौंदर्याने सर्वांना वेड लावलं होतं. प्रसिद्धीच्या झोतात असताना ती अचानक सिनेसृष्टीतून गायब झाली. यानंतर आता तब्बल २५ वर्षांनी ममता कुलकर्णी ही भारतात परतली आहे. ममता कुलकर्णी ही सध्या प्रयागराज महाकुंभला पोहोचली आहे. सध्या ममता कुलकर्णीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या वेशात पाहायला मिळत आहे.
ममता कुलकर्णीने घेतला संन्यास
ममता कुलकर्णीने महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला आहे. ममता कुलकर्णी आज किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनणार आहे. याआधी तिचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णीने अंगावर भगव्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत. त्यासोबतच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा आणि खांद्यावर एक झोली लटकवलेल्या स्वरुपात दिसत आहे. यामुळे ममता कुलकर्णीने संन्यास घेतल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. तिने सिनेसृष्टीचा मार्ग सोडून धार्मिक मार्ग स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे.
नावात बदल
ममता कुलकर्णी ही साधवीच्या वेषात किन्नर आखाड्यात दिसली होती. किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर बांधले जात असून, त्यात पट्टाभिषेक केल्यानंतर ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर ही पदवी देण्यात येणार आहे. त्यापूर्वी ममताने आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले. याचे फोटोही व्हायरल झाले. विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने तिच्या नावातही बदल केला असून ती आता ‘श्री यामाई ममता नंद गिरि’ या नावाने ओळखली जाणार आहे.
फोटो आणि व्हिडीओ व्हायरल
विशेष म्हणजे ममता कुलकर्णीने स्वत: इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत. या फोटोत ममता कुलकर्णी ही साध्वीच्या रुपात पाहायला मिळत आहे. मी आज कुंभमेळ्यात जाणार आहे. येत्या २९ जानेवारीला मौनी अमावस्येला शाही स्नान करुन मी विश्वनाथ मंदिरात जाईन. यानंतर मी अयोध्येत जाऊन तिथे पिंडदान करेन, अशी माहिती ममता कुलकर्णीने दिली आहे. दरम्यान ममता कुलकर्णीचे साध्वी बनल्यानंतरचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिच्या पोस्टवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List