Yuzvendra Chahal Dhanashree Verma – ‘खरं प्रेम मिळणं दुर्मिळ आहे आणि…’, चहलच्या सूचक पोस्टमुळे घटस्फोटाच्या चर्चांना हवा
टीम इंडियाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल गेल्या काही काळापासून आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांच्यात दुरावा निर्माण झाल्याच्या वावड्या उठल्या आहेत. दोघांमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे दिसत असून लवकरच दोघे काडीमोड घेणार असल्याचीही चर्चा आहे. या दरम्यान चहल आणि धनश्रीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करत सर्व फोटोही डिलिट केले आहेत. अर्थात घटस्फोटाबाबत अद्याप दोघांकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही. पण दोघेही आपल्या सोशल मिडिया अकाऊंटवरून पोस्ट करत सूचक इशारे देत आहेत.
घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्यापासून युझवेंद्र चहलने आतापर्यंत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच चहलची एक पोस्ट वेगाने व्हायरल होत असून यामुळे घटस्फोटांच्या चर्चांना आणखी हवा मिळाली आहे. मंगळवारी चहलने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले. अर्थात फोटोपेक्षा त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे. ‘खरे प्रेम मिळणे दुर्मिळ आहे आणि मी स्वत: दुर्मिल आहे’, असे कॅप्शन चहलने दिले असून त्यासोबत एक हसरा इमोजीही शेअर केला आहे.
चहल आणि धनश्रीची प्रेमकथाही अनोखी आहे. लॉकडाऊ दरम्यान दोघांची ऑनलाईन भेट आणि दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. बराच काळ भेटीगाठी झाल्या आणि 2020 मध्ये दोघांनी लग्न केले. अर्थात लग्नाच्या चारच वर्षात दोघांच्या नात्यात दुरावा आला आणि धनश्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून चहल हे आडनाव हटवले. तेव्हापासून दोघांच्या काडीमोडाची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, युझवेंद्र चहलच्या क्रिकेट कारकिर्दीबाबत बोलायचे झाल्यास तो गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. त्याने आपला अखेरचा सामना ऑगस्ट 2023 मध्ये खेळला होता. अर्थात 2024 च्या टी-20 विश्वचषकासाठी त्याची निवड झाली होती, मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यान आतापर्यंत 72 वन डे आणि 80 टी-20 सामन्यात हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले असून यात त्याने अनुक्रमे 121 आणि 96 विकेट्स घेतल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List