उद्या अंधेरीत शिवसेनेचा महामेळावा, उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारी रोजी शिवसेनेचा महामेळावा अंधेरी येथे आयोजित करण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ या मेळाव्यात धडाडणार आहे. नव्या वर्षात उद्धव ठाकरे यांचे हे पहिलेच जाहीर मार्गदर्शन असून त्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून हजारो शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत. उद्धव ठाकरे या मेळाव्यात शिवसैनिकांना आणि महाराष्ट्राला काय संदेश देणार याबद्दल मीडिया आणि सर्वसामान्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
अंधेरी पश्चिमेच्या आझाद नगर, वीरा देसाई रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये सायंकाळी 6 वाजता हा महामेळावा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे या महामेळाव्यानिमित्त तमाम शिवसैनिकांशी पहिल्यांदाच जाहीर संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे कोणती घोषणा करतात, काय आदेश देतात याकडे शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. हजारो शिवसैनिक मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याने शिवसेनेकडून जय्यत तयारी केली जात आहे.
सद्य राजकीय परिस्थिती आणि आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या महामेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेना नेत्यांसह राज्यभरातील शिवसेनेचे पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. उद्धव ठाकरे या मेळाव्याचे प्रमुख मार्गदर्शक असून अन्य महत्त्वाच्या नेत्यांचीही भाषणे यावेळी होणार आहेत. मेळाव्यात वरिष्ठ नेत्यांची भाषणे होणार असून प्रमुख मार्गदर्शन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे राहणार आहे.
क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे 21 आणि 22 जानेवारी रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेतील विजेत्यांचाही या महामेळाव्यात गौरव केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त महासोहळा
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये दिमाखदार महासोहळा होणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा जीवनप्रवास हा मराठी माणसासह तमाम हिंदू बांधवांसाठी प्रेरणा देणारा आहे. राष्ट्राभिमानाचा, धर्माभिमानाचा, भाषाभिमानाचा वन्ही चेतवणारा आहे. या महामेळाव्यात शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट छायाचित्रे आणि चित्रफितींच्या माध्यमातून सर्वांसमोर सादर होणार आहे. शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारी दृश्ये यावेळी दाखवली जाणार आहेत.
स्थळ – छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स
वेळ – सायंकाळी – 6 वाजता
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List