एसटी, बेस्ट, पोलिसांच्या गाड्यांमुळे प्रदूषण वाढले, 13 हजार जुनाट वाहनांतून जीवघेणा धूर; वाहतूक विभागाचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
>>रतींद्र नाईक
मुंबईची हवा आधीच बिघडली असताना त्यात वाहनांतून निघणाऱ्या धुराने अधिकच भर घातली आहे. शासकीय, निमशासकीय अशी सुमारे 13 हजार जुनाट वाहने दररोज जीवघेणा धूर ओकत असून वायुप्रदूषण रोखण्यासाठी ही वाहने स्क्रॅपमध्ये काढण्याचा सल्ला वाहतूक विभागाने सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे धूर सोडणाऱ्या गाड्यांमध्ये एसटी, बेस्ट बसेस यासह पोलीस व राज्य सरकारच्या ताफ्यातील वाहनांचा समावेश असून वाहतूक विभागाने हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातूनच ही माहिती उघडकीस आली आहे.
मुंबईतील प्रदूषित हवेची दखल घेत उच्च न्यायालयाने याप्रकरणी स्युमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठासमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने हवेच्या वाईट दर्जाबाबत चिंता व्यक्त करत सरकारला फटकारले होते. वाहतूक विभागाच्या वतीने सरकारी वकील अॅड. ज्योती चव्हाण यांनी हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केले. सहवाहतूक आयुक्त जयंतकुमार पाटील यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे की, 15 वर्षे जुन्या सरकारी, निमसरकारी अशी सुमारे 13 हजार जुनाट वाहने प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहेत. ही वाहने नोंदणीकृत वाहन व्रॅपिंग सुविधानुसार 31 जानेवारीपूर्वी नष्ट करणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव संबंधित विभागांना पाठवण्यात आला आहे. मोटार वाहन कायदा, 1988 च्या कलम 41(7) नुसार मोटार वाहनांची नोंदणी अनिवार्य असून खासगी वाहनांच्या नोंदणीचे प्रमाणपत्र जारी केल्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंतच ते वैध आहे. इतकेच नव्हे तर 15 वर्षे उलटलेल्या वाहनांचे प्रमाणपत्र नूतनीकरण शुल्कात भरीव वाढ करण्यात आली असून वायुप्रदूषणाला आळा घालण्यासाठी वाहतूक विभागाने नियमित इंधन वापरणाऱया वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी लोकांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे.
612 वाहने स्क्रॅप, 749 वाहने प्रक्रियेत
केंद्र सरकारच्या अंतर्गत असलेल्या एमएसटीसी या संकेतस्थळावर 1238 वाहनांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. 612 वाहने स्क्रॅप करण्यात आली असून 749 वाहने नष्ट करण्याच्या प्रक्रियेत आहेत, अशी माहितीदेखील प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
या विभागाकडे जुनी वाहने
एसटी व बेस्ट बसेस – 6388
पोलीस विभाग – 2910
राज्य सरकार – 2599
स्थानिक स्वराज्य संस्था – 1103
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List