पोलीस डायरी – बांगलादेशी कॅन्सर वाढतोय! सैफ अलीवर खरंच खंडणीसाठी हल्ला?
>> प्रभाकर पवार
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी ऊर्फ टायगर व प्रख्यात अभिनेत्री शर्मिला टागोर यांचे सुपुत्र सैफ अली खान (वय 55, पद्मश्री पुरस्कार विजेते व अभिनेते) यांच्यावर 16 जानेवारी रोजी मध्यरात्री त्यांच्या वांद्रे (पश्चिम) येथील ‘सद्गुरू शरण’ येथील राहत्या घरी एका अज्ञाताने प्राणघातक हल्ला केला, परंतु सुदैवाने सैफ अली वाचले. त्या वेळी तेथे हजर असलेली श्रीमती एलियामा फिलिप (वय 56) ही स्टाफ नर्स आपल्या पोलीस जबाबात म्हणते. “सद्गुरू शरण या इमारतीमधील 11 व 12 व्या मजल्यावर सैफ अली खान परिवार राहतो. सैफ अली यांचा मुलगा जहांगीर (वय 4) यास मी सांभाळते सैफ अली व त्यांची पत्नी करिना दुसऱ्या खोलीत एकत्र राहतात. दुसरा मुलगा तैमूर तिसऱ्या खोलीत गीता या आयाबरोबर राहतो. मी जहांगीरसोबत झोपले असताना अचानक रात्री 2 वाजता (16 जानेवारी) मला जाग आली. कुणीतरी बाथरूममध्ये असल्याचे मी पाहिले. त्याबरोबर तो अज्ञात इसम बाथरूममधून बाहेर आला. त्याने मला धमकावले. त्याच्याकडे असलेल्या धारदार शस्त्राने वार करून मला जखमी केले व एक करोड रुपयाची खंडणी मागितली. तेव्हा माझ्या सोबत असलेली एक सेविका घराबाहेर गेली. तिने आरडाओरडा केला तेव्हा बाजूच्या रूममध्ये असलेले सैफ अली खान व पत्नी करिना कपूर बाहेर आले. त्या वेळी सदर अज्ञात इसमाने सैफ अली खान यांच्यावर हॅक्सॉ ब्लेडने पाठीमागून वार करून त्यांना गंभीर जखमी केले व तो पळून गेला.
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याची पहिली फिर्याद वांद्रे पोलीस ठाण्यात एलियामा या स्टाफ नर्सने वरीलप्रमाणे दिली आहे. सैफ अलीवर हल्ला झाल्यानंतर तो रक्तबंबाळ अवस्थेत आपल्या 18 वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन लीलावती रुग्णालयात रिक्षाने पोहोचला. उपचार घेतल्यानंतर त्याला मंगळवारी डिस्चार्ज देण्यात आला. सैफ अलीवर हल्ला झाल्यानंतर मुंबई पोलिसांची यंत्रणा जागी झाली. क्राइम ब्रँच व स्थानीय पोलीस कामाला लागले. क्राइम बॅचच्या अधिकाऱ्यांनी ठाण्याच्या कासारवडवली येथील मजुरांच्या वस्तीमध्ये धाड घालून शरिफूल इस्लाम शहजाद मो. रोहिल्ला अमीन फकीर या 30 वर्षीय बांगलादेशी घुसखोराला अटक केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
सेलिब्रेटीवरील हल्ल्याची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेऊन 72 तासांत आरोपीला गजाआड केले. तो चोर-घरफोड्या व बांगलादेशी असल्याचे पोलीस सांगत आहेत, परंतु हा बांगलादेशी कॅन्सर आता वेगाने देशभरात वाढत आहे. गेल्या 10 वर्षांत बांगलादेशी घुसखोरांनी नायजेरियन माफियांप्रमाणे आपल्या देशातील प्रमुख शहर काबीज केली आहेत. बनावट नावाने करारनामा करून हे बांगलादेशी एजंटमार्फत भाड्याने घरे घेतात. त्यानंतर आधार, पॅनकार्ड मिळवतात. त्याआधारे बँक खातेही उघडतात. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हा सात-आठ महिन्यांपूर्वी भारतात आला होता. ठाणे. मुंबईत त्याने एजन्सीमार्फत कामे मिळविली होती. त्याने बैंक खातेही उघडले होते. अंधेरी पश्चिम येथील एका ‘झोपु’ योजनेत घुसखोरांनी बनावट नावाची व वास्तव्याची कागदपत्रं सादर करून म्हाडाकडून घरं मिळविली असल्याचे नुकतेच उघडकीस आले आहे. शासकीय यंत्रणाच पोखरल्या गेल्या असल्याने हे सारे सुरू आहे. आपल्या देशात बांगलादेशींची संख्या झपाट्याने वाढत आहे. कंगाल बांगलादेशी एजंटाच्या मार्फत (दोन-चार हजार रुपये देऊन) भारतात प्रवेश मिळवितात आणि खोट्या नावाने वावरतात. विशेषतः हे बांगलादेशी नोकरी किंवा काम मिळावे म्हणून हिंदू नावे वापरतात. ज्या ज्या ठिकाणी बांधकाम, रस्त्याची कामे सुरू असतात अशा ठिकाणी बांगलादेशींचा अधिक वावर असतो. यावर नियंत्रण आणण्यासाठी आता केंद्र शासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. नाहीतर बंगालप्रमाणे साऱ्या देशाचा ‘बांगला’ व्हायला वेळ लागणार नाही.
सैफ अली खानवर हल्ला करणारा बांगलादेशी हा पहेलवान असल्याचे सांगण्यात येते. या पहेलवानाने सैफ अलीच्या पाठीत त्याच्याकडे असलेली कट्यार घुसविली. ती जर पोटात घुसविली असती तर? नशीब बलवत्तर म्हणून सैफ अली वाचले. यापूर्वी मुंबईतील एक डझन सिने अभिनेत्यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. निर्माता जावेद सिद्दिकी, फिरोज खान, राजीव राय, केशरवानी, अनिल थडानी, मनमोहन शेट्टी. राकेश रोशन, लॉरेन्स डिसोजा यांच्यावर अंडरवर्ल्डकडून खंडणीसाठी गोळीबार झाले, अलीकडे सलमान खानवरही हल्ला झालाः परंतु ते बचावले निर्माता मुकेश दुग्गल, दिनेश आनंद, अजित दिवानी, कॅसेट किंग’ गुलशन कुमार यांना मात्र अंडरवर्ल्डच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागले. सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी हाही एक कोटी रुपये खंडणी मागायला आला होता. असे पोलीस सांगतात फिर्यादीच्या जबाबात किती तथ्य आहे हे पोलिसांनाच माहीत, परंतु दाल में कुछ काला है एवढे मात्र नक्की. सैफ अली खान हा भारतातील एक आघाडीचा व यशस्वी अभिनेता मानला जातो. भारतातील संस्थानिकांचे सर्व वतनाधिकार रद्द होईपर्यंत पतौडी संस्थानाचे टायगर पतौडी हे शेवटचे नवाब होते. त्यांच्या सैफ अली खान या मुलाच्या काही गोष्टी अंधारात ठेवण्यासाठी तर हा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही ना? असा सवाल दबक्या आवाजात करण्यात येत आहे. चोर, घरफोडे कधी खंडणी मागत नाहीत. ते दिसेल तो माल उचलून, हिसकावून, बळजबरी करून पळवून नेतात. त्यामुळे आरोपीच्या एक कोटी खंडणीच्या मागणीबद्दल सर्वत्र शंका व्यक्त करण्यात येत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List