बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांचा पुढाकार
मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेल्या बेस्टसाठी मुंबईकरांचाही जीव तुटताना दिसत आहे. कोटय़वधीच्या आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्टला खासगीकरणापासून वाचवण्यासाठी तसेच इतर समस्या आणि सुविधांसाठी मुंबईकरांनी पुढाकार घेतला असून मुंबई महापालिका अर्थसंकल्पासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना पाठवल्या आहेत. पालिकेकडे पत्र आणि ई-मेलद्वारे पाठवलेल्या 2 हजार 703 सूचनांपैकी तब्बल 75 टक्के सूचना या बेस्टबद्दल आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पासाठी प्रशासनाने मुंबईकरांकडून सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते. याला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून गेल्या 15 दिवसांत महापालिकेकडे तब्बल 2 हजार 238 पत्रे तसेच ई-मेल आले आहेत. त्यात तब्बल 2 हजार 703 सूचना करण्यात आल्या आहेत. या सूचनांपैकी सर्वाधिक 2 हजार 48 सूचना या बेस्ट उपक्रमाबद्दल आहेत. सूचना पाठवण्याची शेवटची तारीख शुक्रवार, 17 जानेवारी होती. अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये मुंबईकरांचा लोकसहभाग असावा यासाठी मुंबई महापालिकेने सूचना पाठवण्याचे आवाहन केले होते.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात अर्थसंकल्प
मुंबई महापालिकेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सादर केला जाणार आहे. अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी पालिका प्रशासन नगरसेवक, नागरिकांकडून सूचना मागवते. मात्र मुदत संपूनही निवडणूक झाली नसल्याने पालिकेचा कारभार गेल्या तीन वर्षांपासून प्रशासक पाहत आहेत. नगरसेवक नसल्यामुळे मुंबई महापालिकेचे कामकाज पालिका आयुक्त आणि प्रशासक असलेले भूषण गगराणी पाहत आहेत. अर्थसंकल्प प्रशासक भूषण गगराणी सादर करणार आहेत.
खासगीकरण, अपघातांना आळा घाला!
बेस्टचा परिवहन उपक्रम सध्या कोटय़वधीच्या आर्थिक तोटय़ात आहे. ताफ्यात पंत्राटी बस घेऊ नका, स्वमालकीच्या बस घ्या, खासगीकरण तसेच सातत्याने होणारे बसचे अपघात या समस्यांवर मुंबईकरांनी सूचनांमधून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. बेस्ट वाचवण्यासाठी मुंबईकरांनी पुढाकार घेतला असून त्याचेच प्रतिबिंब त्यांनी पाठवलेल्या सूचनांमध्ये दिसत आहे. त्यामुळे आर्थिक तोटय़ात असलेल्या बेस्ट उपक्रमाला अर्थसंकल्पात पालिका किती कोटींची मदत जाहीर करते, याकडेही मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List