सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, चार दिवसांनी अखेर आरोपीला अटक
Saif Ali Khan Accused Arrest : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. विजय दास असे आरोपीचे नाव आहे. काल मध्यरात्री उशिरा ठाण्यातील कासारवडवली भागातून त्याला अटक करण्यात आली आहे. सध्या आरोपीची खार पोलीस स्टेशनमध्ये चौकशी करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सैफ अली खानवर चाकू हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. वांद्रे पोलीस, मुंबई गुन्हे शाखा आणि ठाणे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईतून ही अटक करण्यात आली आहे. ठाणे परिसरातून मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट येथील टीसीएस कॉल सेंटरच्या मागे मेट्रो कन्स्ट्रक्शन साईटजवळ असलेल्या लेबर कॅम्पमधून त्याला अटक करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांची 9 वाजता पत्रकार परिषद
विजय दास हा सुरुवातीला ठाण्यात हिरानंदनी परिसरात काम करत होता. त्यामुळे त्याला या भागाची संपूर्ण माहिती होती. तो ठाण्याती लेबर कॅम्पजवळील जंगलात लपून बसला होता. विजय दासने यापूर्वी मुंबईतील एका पबमध्ये काम केल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपी विजयला अटक केल्यानंतर आज पोलीस त्याला न्यायालयासमोर रिमांडसाठी हजर करणार आहेत. या कारवाईनंतर आज सकाळी ९ वाजता मुंबई पोलीस अधिकारी पत्रकार परिषद घेऊन याप्रकरणातील अपडेट देणार आहेत.
दरम्यान सैफ अली खानवर झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा आज चौथा दिवस आहे. गेल्या चार दिवसांपासून मुंबई पोलीस ज्या प्रश्नांचा शोध घेत होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. सैफ अली खानच्या घरात आरोपी कसा घुसला? आरोपींचा हेतू काय होता? या कामात त्याला साथ देणारा दुसरा कोणी आहे का? त्याने आणखी किती बॉलिवूड कलाकारांच्या घराची रेकी केली आहे? सैफच्या घरी जाण्याचा त्याचा उद्देश काय होता? त्याला कोणाला टार्गेट करायचा होते? ज्यांच्या मदतीने आरोपी सैफच्या घरी पोहोचला तो कोण आहे? असे अनेक मोठे प्रश्न उपस्थित होत आहे. आज पोलीस चौकशीदरम्यान याप्रकरणाची उत्तर शोधणार आहेत.
नेमकं प्रकरण काय?
सैफ अली खानवर राहत्या घरी गुरुवारी हल्ला झाला. गुरुवारी (१६ जानेवारी) मध्यरात्री 2 वाजता एक चोर सैफच्या घरात घुसला. त्यावेळी त्याच्या घरात काम करणाऱ्या एका मोलकरणीने चोराला पाहिले. तिने आरडाओरड सुरु केली. यावेळी बेडरुममध्ये झोपलेला सैफ जागा झाला. त्याने त्या हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सैफ आणि चोरामध्ये झटापट झाली. यात त्या चोराने सैफवर चाकूने हल्ला केला. यात त्याच्या मानेला, डाव्या मनगटाला, छातीला तसेच पाठीला गंभीर दुखापत झाली. यावेळी चोराने त्याच्यावर ६ वार केले.
यानंतर सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैफ अली खानवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सैफ अली खान हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List