मागे वळून पाहताना – वन वुमन इंडस्ट्री
>> पूजा सामंत
हिला ड्रेसिंग सेन्स नाही, ती इन शेप नाही म्हणून रेडिओ जॉकीजने चेष्टेचे सूर आळवले… पण माझ्या यशाच्या प्रवासाने मला स्टारडम दिला. आणि एवढंच नाही तर ‘वन वुमन इंडस्ट्री’ हा किताब दिला, अजून काय पाहिजे! आज मागे वळू पाहताना डोळ्यांत हास्य लकेरी उमटतात. ईश्वराची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि माझा स्वतवर असलेला अटळ विश्वास यामुळे मी पुढे जात राहिले. आता मागे वळून पाहताना जे घडलं ती मीच होते का असं प्रश्न पडतो… स्टारडम मिळवणारी विद्या बालन सांगतेय…
मुंबईच्या चेंबूर उपनगरात मी तामीळ ब्राह्मण कुटुंबात जन्मले, लहानाची मोठी झाले. माझे आप्पा पी. आर. बालन हे डिजिकेबल कंपनी व्हाईस प्रेसिडेंटपदावर नोकरी करत, तर अम्मा सरस्वती गृहिणी. माझी मोठी बहीण प्रियाबरोबर अगदी बालपणापासूनच माझा मस्त सुसंवाद, छानसं मेतकूट असायचं. जे आजही तितकंच सशक्त आहे. आमच्या चौघांसह आमची आजी आमच्या कुटुंबाचा अविभाज्य भाग असे. एकंदरीत मध्यमवर्गीय मूल्यांमध्ये मी वाढले. सिनेमाशी आमचा काहीही संबंध नव्हता, असण्याचा काही प्रश्नही नव्हता. मी मात्र टीव्हीवर प्रदर्शित होणारे बहुतेक चित्रपट पाहत असे. अमिताभ बच्चन यांचे हाणामारीचे चित्रपट, त्यांची अदाकारी मला आकर्षित करत असे. माधुरीला मी ‘एक, दो, तीन…’ या गाण्यात पाहिलं आणि तिच्यासारखी डान्स प्रॅक्टिस आरशात पाहून मी करू लागले. त्यावेळी खरं तर मला फिल्मी किडा चावला होता. मला अभिनयाची भलतीच भुरळ पडली आणि मनातल्या मनात मी अभिनय क्षेत्रात जाण्याचे मांडे आखू लागले. आरशासमोर ओढणी घेऊन ‘एक, दो, तीन…’ या गाण्यावर थिरकत असे. तिचा बेफाम डान्स मला पुरता वेडावून गेला होता. अमिताभ यांची डायलॉगबाजी माझ्या अंगावर रोमांच फुलवत असे. पण अनेक महिने माझ्या या दिवसाढवळ्या पाहिलेल्या स्वप्नांचा अम्माला काहीच पत्ता नव्हता. प्रियादीदी आणि आप्पा यांना कळून चुकलं की, मी अभिनयाच्या स्वप्ननगरीत रमलेय. आमचे लागेबांधे फिल्मी दुनियेशी अजिबातच नव्हते. फक्त स्वप्न बघून अभिनयात प्रवेश मिळत नसतो हे आप्पांनी मला परोपरीने समजावून सांगितलं. पण सगळं पालथ्या घडय़ावर पाणी. अभिनयाचं झपाटलेपण काही केल्या आटोक्यात येईना.
आम्ही दोघी बहिणींनी शास्त्रीय नृत्य शिकवण्यासाठी घरी गुरुजी यायचे. हे गुरूजी रविवारी सकाळी 7 वाजता येत असत. मी आणि प्रियाने नृत्य शिकणं सुरू केलं खरं, पण रात्री उशिरापर्यंत मला झोप लागत नसे. मग पहाटे 3-4 वाजता केव्हातरी निद्रेच्या आधीन होणारी मी रविवारी सकाळी 6 वाजता उठून सगळं आटपून नृत्य करणं मला थकवणारं होतं. मी आप्पांना सांगितलं, मला पहाटे उठणं जमत नाहीये. सबब मी डान्स शिकू शकणार नाही. मी नकार दिल्यावर अम्मा खूप चिडली. बहुतेक दाक्षिणात्य कुटुंबातून मुलींनी शास्त्रीय नृत्य शिकणं हा परंपरेचा भाग असतो. “विद्या, तू फिल्मी गाण्यावर ओढणी घेऊन नाचतेस. मग हा उत्साह शास्त्रीय नृत्य शिकताना कुठे जातो? ’’ तर असं माझं नृत्य शिकणं मी व्यर्थ घालवलं. हल्लीच ‘भूलभुलैया -3’ मधील ‘आमि जे तोमार’ या बंगाली गाण्यावर मला माधुरी दीक्षितसारख्या कसलेल्या अभिनेत्रीसोबत नृत्य करायचं समजलं तेव्हा माझ्यावर मोठं दडपण आलं होतं. माधुरी ज्येष्ठ आहेच, पण तिच्यासोबत माझ्यासारख्या ‘नॉन डान्सर’ला डान्स करणं म्हणजे माझ्या पोटात गोळा येणं स्वाभाविकच होतं. त्यातून आम्हा दोघींचा सराव वेगवेगळा होत होता. त्यामुळे प्रत्यक्ष टेकिंगच्या वेळी माझी तारांबळ उडाली. त्यातून ‘आमि जे तोमार’साठी कॅमेरा रोल झाला आणि माधुरीने ऐनवेळी तिच्या स्टेप्स बदलल्या. मला हा डान्स जमणार नाही असं दिग्दर्शक अनिस बजमीला सांगितलं. पण माधुरीने स्वत मला त्या नव्या स्टेप्स शिकवल्या आणि या ‘आमि जे तोमार’ या जुगलबंदी नृत्याचा अंत गोड झाला.
माझ्या कुटुंबाचा अभिनय क्षेत्रात जाण्याला विरोध होता, कारण जे क्षेत्र आपलं नाही, दुरून फक्त चकचकीत दिसणारं आहे अशा क्षेत्रात करीअर करू नये असं सगळ्यांचं मत होतं. पण आप्पांनी माझी अभिनय क्षेत्रात जाण्याची तळमळ समजून घेतली आणि माझा त्या दिशेने प्रवास वा संघर्ष सुरू झाला. टीव्ही मालिकांसाठी मी अनेक ऑडिशन दिल्या. एकता कपूरच्या ‘हम पांच’मध्ये राधिका माथूर व्यक्तिरेखेसाठी माझी निवड झाली.
सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिकत असताना जाहिरात क्षेत्रातले प्रसिद्ध आडगुरू प्रदीप सरकार कालेजमध्ये आले. त्यांनी त्यांच्या काही आड फिल्म्ससाठी ऑडिशन्स घेतल्या आणि तब्बल 60 जाहिराती, शुभा मुद्गल आणि युफोरिया हा म्युझिक अल्बम मी तेव्हा केला. त्या ऑडिशनमधून माझी निवड झाली होती. कुटुंबियांना माझ्याबद्दल आता खात्री वाटू लागली. मला अभिनय क्षेत्रात नुसता पोकळ रस नाही, तर माझ्यात टॅलेंट आहे. पुढे अनेक दाक्षिणात्य चित्रपटांसाठी ऑडिशन्स देत गेले. पण ज्या दाक्षिणात्य चित्रटासाठी निवड झाली तो रखडला. माझ्यावर ‘जिंक्स्ड’ ‘अपशकुनी’ असा ठप्पा लागला. दक्षिणेतले ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांच्या फिल्ममध्ये मी करारबद्ध झाले. माझं वय तेव्हा 22, तर मोहनलाल 44 वर्षांचे होते आणि मी त्यांची नायिका! पण चित्रपट घोषणा होऊन थांबला. मोहनलाल यांच्या फिल्ममधूनही माझी गच्छंती झाली. मी पुरती निराश झाले. के. बालचंदर या प्रख्यात निर्मात्याने मला घरी येऊन सायनिंग अमाऊंट दिली. येणाऱया 1 तारखेपासून फिल्मचे आऊटडोअर शूटिंग न्यूझीलंड येथे सुरू होणार होते. आता माझी कारकीर्द खऱया अर्थाने सुरू होईल असा विश्वास वाटू लागला. मी अम्माला रोज घरी फोन करून सांगत असे की के. बालचंदर यांच्या ऑफिसमधून माझा पासपोर्ट मागण्यासाठी फोन येईल. कारण मला खात्री होती. एका कामानिमित्त मी चर्चगेटला गेले होते. न्यूझीलंडचे शूटिंग सुरू व्हायचे होते. अजून फोन कसा आला नाही. मी चर्चगेटहून अम्माला फोन केला. ‘के. बालचंदर यांच्या प्रोडक्शन मॅनेजरचा फोन आला नं?’’ असं अम्माला विचारताच तिने निराशेच्या स्वरात म्हटलं, “विद्या, घरी ये. आल्यावर बोलू आपण.’’ मी हताश झाले. अम्माने स्वत के बालचंदर ऑफिसमध्ये फोन केला तेव्हा समजलं. न्यूझीलंडला शूटिंग सुरू झालं आणि माझी रिप्लेसमेंट केली गेली होती. पण मला काढून टाकलं हे सांगण्याचं त्यांनी सौजन्य दाखवलं नव्हतं. मला इतका धक्का बसला की, भरकटल्यासारखी मी नरिमन पॉइंट ते बांद्रा चालतच राहिले. हे प्रकार माझ्याबाबत का घडताहेत? जीवनात रस वाटेनासा झाला होता.
विधु विनोद चोप्रा यांनी ‘परिणीता’ या शरतचंद्र चट्टोपाध्याय लिखित मूळ बंगाली कादंबरीवर आधारित चित्रपटाची जबाबदारी प्रदीप सरकारकडे दिली होती. विधु विनोद चोप्रा यांच्या कल्पनेतली नायिका पारंपरिक सुंदर, ग्लॅमरस अशी नवतारका होती. त्यात कल्पनेत मी कुठेही बसत नव्हते. मग चोप्रा यांच्या कल्पनेनुसार माझ्यावर मेकओव्हर सुरू झाला. स्ट्रेटनिंगचे अनेक प्रयोग झाले. माझ्या केसांवर हा जीवघेणा प्रकार होता. लुक्सवर अनेक प्रयोग झाले आणि तब्बल एक वर्षाच्या परिश्रमांनंतर मी ‘परिणीता’ ठरले! या चित्रपटाला व्यावसायिक यश तर मिळालंच, तशीच ही एक कल्ट क्लासिक फिल्मही ठरली.
पुढचा प्रवास तितका सोपा नव्हता. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यशस्वी ठरला. पण ‘हे बेबी’च्या प्रमोशनदरम्यान मला ड्रेसिंग सेन्स नाही, मी इन शेप नाही म्हणून रेडिओ जॉकीजने चेष्टेचे सूर आळवले. नंतरच्या टप्प्यावर मात्र पा, भूलभुलैया, इश्कियां, द डर्टी पिक्चर, नो वन किल्ड जेसिका, कहानी, तुम्हारी सुलू, मिशन मंगल, गुरू… अशा यशस्वी चित्रपटांनी मला स्टारडम दिलं आणि चक्क ‘वन वुमन इंडस्ट्री’ अशा विशेषणांनी मला संबोधण्यात येऊ लागलं! अनेकदा वाटतं ‘झिरो से हीरो’ हा माझाच प्रवास आहे का?
अलीकडे माझ्या गोलमटोल व्यक्तिमत्त्वावरून माझं ट्रोलिंग होत होतं. पण एका थेरपीचा मला उत्तम उपयोग झाला आणि मी सुडौल झाले. ईश्वराची कृपा, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि माझा स्वतवर असलेला अटळ विश्वास या जोरावर मी पुढे जात राहिले. आता मागे वळून पाहताना जे काही घडलं ते माझ्याबरोबर होतं का? ती मीच होते का असं वाटतं आणि डोळ्यांत हास्य लकेरी उमटतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List