सूर-ताल – देवगड ते मुंबई

सूर-ताल –  देवगड ते मुंबई

>> गणेश आचवल

प्रसाद पाध्ये… तबला वादनात स्वतचे स्थान निर्माण करणारा गुणी कलावंत. वेगवेगळय़ा माध्यमात लोकप्रियता मिळवणाऱया प्रसादला कलेप्रति आजही तितकाच निष्ठा आहे.

सूर नवा ध्यास नवा, झी मराठी सा रे ग म प चा अंतिम सोहळा असेल, गौरव महाराष्ट्राचा यासारखे रिआलिटी शो किंवा हरिहरन, शंकर महादेवन यासारख्या नामवंत गायकांच्या कॉन्सर्टस् असतील, या ठिकाणी तबला वादक म्हणून एक चेहरा गेली वीस वर्षांहून अधिक काळ आपल्या परिचयाचा झाला आहे आणि तो चेहरा आहे प्रसाद पाध्ये याचा. तबला वादनात स्वतचे स्थान निर्माण करणारा हा गुणी कलावंत.

प्रसाद मूळचा देवगड परिसरातील जामसंडे गावातला. तेथेच त्याचे शालेय शिक्षण झाले. त्याचे वडील विलास पाध्ये हे कीर्तनकारांना तबला वादनाची साथ करत. त्यामुळे प्रसादला सुरुवातीचे तबला वादनाचे धडे हे वडिलांकडूनच मिळाले. प्रसाद जेव्हा पाचवीमध्ये होता तेव्हापासून कोल्हापूरहून आमोद दंडगे हे त्याला आणि गावातील काही मुलांना तबला शिकवण्याकरिता जामसंडे येथे दर आठवडय़ाला येऊ लागले. नंतर तबला शिकणाऱया मुलांची संख्या कमी झाली आणि तबला प्रशिक्षण थांबले. मात्र आमोद सरांनी प्रसादला त्याच्या दहावीनंतर तबला शिकण्यासाठी कोल्हापूरला यायला सांगितले.नंतर मुंबईला आल्यावर प्रसादने पंडित अरविंद मुळगावकरांकडे तबल्याचे शिक्षण सुरू केले. उस्ताद आमीर हुसेन खांसाहेब हे पंडित मुळगावकरांचे गुरू. उस्तादजींच्या शंभर बंदिशींचा एक जाहीर कार्यक्रम होता, तो प्रसादच्या आयुष्यातील पहिला मोठा कार्यक्रम. मुंबईमध्ये असताना पंडित राम देशपांडे, अश्विनी भिडे-देशपांडे यांच्या क्लासमधील मुलांच्या तालमीकरिता प्रसाद तबला वादन करत होता. मग काही मैफलींमध्ये तसेच पंडित उल्हास बापट यांच्या कार्यक्रमासाठी प्रसादने परदेश दौरादेखील केला.

आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉइंटविषयी तो म्हणाला, ‘जेव्हा कमलेश भडकमकर याच्याशी माझी ओळख झाली त्यादरम्यान ‘सा रे ग म प’चा अंतिम सोहळा होणार होता, त्या सोहळय़ात मला तबला वादन करता आले. सा रे ग म प लिटल चॅम्प्स तसेच महागायक अंतिम फेरी सोहळय़ातही मी तबला वादनासाठी होतो. ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील गाण्यांसाठी तबला वादन करण्याची संधी संगीतकार कौशल इनामदार आणि आदित्य ओक यांनी दिली. तो म्हणतो, गाण्यांचे ध्वनिमुद्रण करताना तबला वादन करणे हे खूप आव्हानात्मक आहे. कारण इतर वाद्यांबरोबर आपले तबला वादन ऐकू जाणे हे महत्त्वाचे आहे. त्यासाठी योग्य त्या तंत्रज्ञानाचा अभ्यास मी आत्मसात केला. प्रसादने त्यानंतर मोरया, कटय़ार काळजात घुसली, उबंटू, मी वसंतराव, भाई व्यक्ती की वल्ली आणि संगीत मानापमान या चित्रपटांतील गाण्यांसाठीदेखील तबला वादन केले आहे.

एकदा हरिहरन यांच्या फार्म हाऊसवर एक मैफल होती. समोर शंकर महादेवन, उस्ताद झाकीर हुसेन असे दिग्गज कलाकार होते. मैफल संपल्यावर हरिहरन यांनी उस्ताद झाकीर साहेबांशी माझी ओळख करून दिली. झाकीरजींनी माझे कौतुक केले आणि त्यांच्या कुटुंबीयांनादेखील सांगितले की हा मुलगा चांगले तबला वादन करतो. हा त्याच्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण होता.
संगीतकार श्रीनिवास खळे काकांच्या आग्रहामुळे त्याला ‘गुरू कृपांजन’ आणि ‘नाथ माझे’ या अल्बमसाठी तबला वादनाची संधी मिळाली. गायक कलाकार राहुल देशपांडे, जयतीर्थ मेवुंडी, आनंद भाटे, महेश काळे, राकेश चौरसिया, हरिहरन, शंकर महादेवन, कौशिकी चक्रवर्ती अशा अनेक नामवंत कलावंतांच्या मैफलीत प्रसादचे तबला वादन अनेकांनी पाहिले आहे. विविध माध्यमांतील आव्हानांविषयी तो म्हणतो, ‘रियालिटी शोकरिता वादक म्हणून काम करताना नोटेशन जसे आहे तसे वादन करावे लागते, स्पर्धकांना सांभाळून घ्यावे लागते, तर दिग्गज गायकांच्या मैफलीत आपले वाद्य कसे रंग भरेल व ती मैफल अधिकाधिक चांगली होण्याकडे उद्दिष्ट असतो. चित्रपट वा वेब सीरिजसाठी ध्वनिमुद्रण करताना सध्याच्या तंत्रज्ञानाचा विचार करणे गरजेचे असते.

देशात-परदेशात अनेक ठिकाणी प्रसादने आपली कला सादर केली आहे. ‘दरबार फेस्टिव्हल’ तसेच ‘बंदिश बँडिट’ ही वेब सीरिजसाठी प्रसादने तबला वादन केले आहे. आजही दररोज पाच ते सहा तास तो तबल्याचा रियाज करतो. पंडित डी. बी. पलुस्कर पुरस्कार, कंठे महाराज पुरस्कार, वल्हेमामा स्मृती पुरस्कार अशा पुरस्कारांचा मानकरी ठरलेला प्रसाद पाध्ये आज वेगवेगळय़ा माध्यमात लोकप्रियता मिळवताना दिसत आहे.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, चार दिवसांनी अखेर आरोपीला अटक सैफ अली खान हल्लाप्रकरणी मोठी अपडेट, चार दिवसांनी अखेर आरोपीला अटक
Saif Ali Khan Accused Arrest : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. सैफ अली खानवर...
Saif Ali Khan Attack – सैफवरील हल्लेखोराला 72 तासानंतर अटक, ठाण्यातून आवळल्या मुसक्या
राखमाफियांच्या दहशतीचे चटके; 150 कर्मचाऱ्यांची भुसावळला बदली
महारेरा तुमच्या दारी! मुंबईसह आता नागपूर आणि पुण्यातदेखील घेणार विशेष खुले सत्र, गृहनिर्माण प्रकल्पाच्या नोंदणीसाठी होणार मदत
कबुतर दाखवतो सांगून लैंगिक अत्याचार, आरोपीला 10 वर्षे कारावासाची शिक्षा
लाडक्या बहिणींनी दिलेली मतं सत्ताधारी पक्ष परत करणार का?
रोखठोक – नमक हरामांची हवेली!