“मी गोळी मारली असती तर थेट..”; गोविंदाची पत्नी असं का म्हणाली?
गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात अभिनेता गोविंदाच्या पायाला चुकून बंदुकीची गोळी लागली होती. त्याच्या स्वत:च्याच रिव्हॉल्वरमधून ही गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली होती. गोविंदा त्याची परवानाकृत रिव्हॉल्वर कपाटात ठेवत होता, त्याचवेळी ती चुकून खाली पडली आणि त्यातून सुटलेली गोळी गोविंदाच्या डाव्या पायाच्या गुडघ्याला लागली होती. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गोविंदाची पत्नी सुनीता अहुजा या घटनेविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. ज्यावेळी गोविंदाला गोळी लागली होती, तेव्हा सुनीता शहरात नव्हती.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलाखीतत सुनीता हसत म्हणाली, “गोविंदाने अर्धच सत्य गोष्ट सांगितली होती. मी शिल्पाला सांगितलं होतं की मी गोळी मारली असती तर पायावर नव्हे तर थेट छातीवर मारली असती. काम करायचं तर पूर्ण करायचं, अन्यथा नाहीच करायचं.” ‘द कपिल शर्मा शो’मध्ये जेव्हा गोविंदाने हजेरी लावली होती, तेव्हा अभिनेत्री शिल्पा शेट्टीने त्याला गोळी लागल्याच्या घटनेवरून मस्करीत प्रश्न विचारला होता. “गोळी चुकून लागली की पत्नी सुनीताने तुम्हाला मारली”, असं तिने मस्करीत विचारलं होतं. याचंच उत्तर सुनीताने आपल्याच अंदाजात दिलं.
त्या घटनेविषयी सुनीता पुढे म्हणाली, “मी त्यावेळी मुंबईत नव्हते आणि मुलगा यश बँकॉकमध्ये होते. मी त्याला सांगितलं नव्हतं पण मी खाटूश्यामला प्रार्थनेसाठी गेले होते. ज्यादिवशी गोविंदाच्या पायाला गोळी लागली, तेव्हा मी सकाळी ध्यानसाधना करत होते. त्याचदिवशी तो कोलकाताला दुर्गापुजेसाठी जात होता. अचानक मला माझ्या ड्राइव्हरने कॉल केला. सहसा मी ध्यानसाधना करताना फोनकॉल उचलत नाही. पण त्याने दोन वेळा फोन केल्याने मी तो फोन उचलला. कदाचित गोविंदाने त्याला फोन करायला सांगितलं असावं. ड्राइव्हरने सांगितलं तेव्हा माझा पहिला प्रश्न हाच होता की, गोळी कोणी झाडली? तेव्हा त्याने सांगितलं की, नाही.. गोविंदाकडूनच चुकून लागली.”
“गोविंदाला गोळी लागल्याचं कळताच मी तातडीने मुंबईसाठी निघाले. जेव्हा मी रुग्णालयात पोहोचले, तेव्हासुद्धा माझा पहिला प्रश्न त्याला हाच होता की, तू स्वत:लाच मारून घेतलंस का? तेसुद्धा अशा ठिकाणी गोळी लागली. जिथे लागायला पाहिजे होती तिथे नाही लागली. तेव्हा तो म्हणाला, तू तर खुश असशील आता? तेव्हा मी मस्करीत म्हणाले की, छातीवर गोळी लागली असती तर मी जास्त खुश झाले असते (हसते”, असं तिने पुढे सांगितलं.
गोविंदाची मुलगी टिनाने त्याला रुग्णालयात नेलं होतं. सुनीता म्हणाली, “जेव्हा त्याला गोळी लागली, तेव्हा घरात ड्राइव्हर, बॉडीगार्ड आणि एक कर्मचारी होता. टिना तिच्या फ्लॅटमध्ये झोपली होती आणि गोविंदा बंगल्यात होता. मी तिला फोन करून सांगितलं तेव्हा ती तातडीने गोविंदाला घेऊन रुग्णालयात गेली. मी सतत फोनवरून अपडेट्स जाणून घेत होती.”
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List