उद्याचं आंदोलन मागे, एसआयटीच्या भेटीनंतर काय म्हणाले धनंजय देशमुख?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेला आता एक महिना उलटला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर देखील आरोप करण्यात आले होते. मात्र त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई न करण्यात आल्यानं मस्साजोगचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख देखील सहभागी झाले होते. या आंदोलनानंतर धनंजय देशमुख यांनी सीआयडी आणि एसआयटी पथकाची भेट घेतली. या भेटीनंतर आता त्यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले धनंजय देशमुख?
आम्हाला हवी असलेली माहिती मिळाली नाही, एसआयटीचे अध्यक्ष बसवराज तेली आजच्या बैठकीत नव्हते, ते उद्या येणार आहेत. तपास योग्य दिशेन सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. आमची वीस ते पंचवीस मिनीट अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. सर्व तेच ते मुद्दे आहेत. तेली साहेब आज बाहेर आहेत, त्यामुळे ते उद्या भेटतील, लेखी स्वरुपात काय काय हवं आहे, ते अधिकाऱ्यांना दिले आहे, उद्याचे आंदोलन मागे घेतले आहे. जी काय चर्चा झाली त्यावर समाधान व्यक्त करता येणार नाही. मात्र आमचा विश्वास तपास यंत्रणांवर आहे, तेली साहेबांना उद्या भेटणार आहे. त्यामुळे उद्याचं आंदोलन स्थगित केलं आहे. या आंदोलनाबाबत या भेटीनंतर निर्णय घेऊ असं देशमुख यांनी म्हटलं आहे.
नवीन एसआयटीची स्थापना
दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. मात्र या एसआयटीवर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाकडून आक्षेप घेण्यात आला होता. यातील काही अधिकाऱ्यांचे वाल्मिक कराड याच्यासोबत संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आता नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. नव्या एसआयटीचे अध्यक्ष देखील बसवराज तेली हेच आहेत. नव्या एसआयटीमध्ये अनिल गुजर. विजयसिंग जोनवाल, महेश विघ्ने, आनंद शंकर शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज राजेंद्र वाघ,चंद्रकांत एस काळकुटे, बाळासाहेब देविदास अहंकारे, संतोष भगवानराव गित्ते या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List