HMPV विषाणू नेमका काय? काय करावे, काय करु नये, कशी घ्याल काळजी? आरोग्य विभागाकडून परिपत्रक जारी
HMPV Virus Precautions : कोरोना व्हायरसनंतर आता चीनमध्ये आणखी एक नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. या विषाणूचे नाव ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP)असे आहे. सध्या चीनमध्ये कोरोनासारखी स्थिती निर्माण झाली आहे. या विषाणूचे भारतात 6 रुग्ण आढळले आहेत. यात कर्नाटक 2, गुजरात 1, पश्चिम बंगाल 1 आणि तामिळनाडू 2 अशी रुग्णांची संख्या आहे. तसेच या ह्युमन व्हायरसचे नागपूरात 2 संशयित रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP) हा व्हायरस नक्की काय? आणि त्याच्यापासून काय काळजी घ्यावी यासंदर्भात पुण्यातील आरोग्य सेवा संचलनालयाने एक परिपत्रक जारी केले आहे.
आरोग्य सेवा संचलनालयाने जारी केले परिपत्रक
पुण्यातील आरोग्य सेवा संचलनालयाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आतापर्यंत एकही एचएमपीव्हीचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस म्हणजेच एचएमपीव्ही ( HMVP) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये २००१ मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे. हा एक हंगामी रोग आहे जो सामान्यतः आरएसव्ही आणि फ्लूप्रमाणेच हिवाळा आणि उन्हाळयाच्या सुरुवातीला उद्भवतो.
सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील श्वसनाच्या संसर्गाची आकडेवारीही जाहीर केली आहे. यानुसार २०२३ च्या तुलनेत डिसेंबर २०२४ मध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. यानुसार खबरदारीचा एक भाग म्हणून नागरिकांनी श्वसनाच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये याबद्दल सूचनांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
काय काळजी घ्याल?
- जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल, तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
- साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
- ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
- भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा
- संक्रमण कमी करण्यासाठी सर्व ठिकाणी पुरेसे व्हेंटीलेशन होईल, याची दक्षता घ्या.
काय करु नये?
- हस्तांदोलन
- टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
- आजारी लोकांशी जवळचा संपर्क
- डोळे नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणे.
- सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणे.
अहवाल सादर करण्याच्या सूचना
चीनमधून आलेल्या नवीन विषाणू Human Metapneumovirus (HMPV) अहवालांबाबत चिंतेचे काही कारण नाही. याबाबत आवश्यक दक्षता घेण्यात येत आहे. यामुळे या आजाराबद्दल नाहक भितीचे वातावरण निर्माण करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वेक्षण अधिक गतिमान करुन सर्दी-खोकल्यासंबंधित रुग्णांचे नियमित सर्वेक्षण अहवाल सादर करण्यात यावेत, अशा सूचना पुण्यातील आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी दिल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List