Pune crime news – घरफोडी करणारी मध्य प्रदेशातील टोळी जेरबंद, मंचरमधील गुन्ह्याचा छडा; 13 लाखांचा ऐवज जप्त
मंचरसह जिल्ह्याच्या विविध भागांत घरफोडी करणाऱ्या मध्य प्रदेशातील चौघांना मंचर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 13 लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती खेड उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलमसिंग ईस्तो बामनिया (वय – 31, रा. करवट, जि. धार, मध्य प्रदेश), अवलसिंग रामसिंग भुरिया (वय – 50, रा. देवधा, जि. धार, मध्य प्रदेश), चमसिंग बदरू बामनिया (वय – 39, रा. छडावद, जि. धार, मध्य प्रदेश), करणसिंग कालूसिंग घुरिया (वय – 38, रा. घोडदल्या, जि. धार, मध्य प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
2 डिसेंबर रोजी मंचर येथील लक्ष्मीपूजन सोसायटीमध्ये तीन बंद सदनिका फोडून तीन लाख 92 हजार पाचशे रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने, तीन लाख 80 हजार रोख रक्कम अशी सात लाख 72 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. याबाबत लक्ष्मण अरुण दातखिळे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल मांडवे यांनी तपास पथकाची नेमणूक करून सहायक पोलीस निरीक्षक सुनील बंडगुजर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास सुरू केला.
सीसीटीव्ही, स्थानिक नागरिकांकडून माहिती आदी गोष्टींचा अवलंब करून आरोपी हे मध्य प्रदेश येथील असल्याचे निष्पन्न केले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी पुन्हा महाराष्ट्रात आले असून ते चारचाकीतून खेड मार्गे भीमाशंकर येथे जात असल्याचे समजले, त्याक्षणी सहायक पोलीस निरीक्षक सुनील बंडगुजर व सहकाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपींनी मंचर येथील सहा त्याचबरोबर वडगाव मावळ, भोर, सासवड व पौड पोलीस स्टेशनअंतर्गत चार घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे. आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीदरम्यान आरोपींनी या गुन्हांमधील चोरी केलेले सोने चांदीचे दागिने व रोकड मध्य प्रदेशातील एका ठिकाणी ठेवली असल्याचे सांगितले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, हवालदार संजय नाडेकर, अजित पवार, योगेश रोडे, हनुमंत ढोबळे यांनी मध्य प्रदेश येथून आरोपीकडून 8 लाख 20 हजार 479 रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच गुन्ह्यात वापरलेली ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण 13 लाख 20 हजार 479 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे, पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक सुनिल धनवे, हवालदार संजय नाडेकर, शेखर भोईर, राजेश नलावडे, नंदकुमार आढारी, प्रणयकुमार उर्किडे, शरद कुलबडे, योगेश रोडे, अजित पवार, हनुमंत ढोबळे, सुनील काठे, प्रदीप गर्जे, अविनाश दळवी, लखन माने यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List