राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो! – संजय राऊत
राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्रही नसतो. आम्ही 25 वर्ष मित्र होतो. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हते तेव्हापासून भाजप-शिवसेनेची युती होती. भाजपचे आम्ही सगळ्यात जुने आणि विश्वासार्ह मित्र होतो. पण आज आम्ही मित्र राहिलो नाही. मित्राने लात घातली, त्यामुळे स्वाभिमानी पक्ष असल्याने आम्ही आमचे राजकारण सुरू केले. पण राजकारणात काही असंभव नसते. भाजपचे राजकारण हे व्यक्तिगत सुडाचे आणि शत्रूत्वाचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊ नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना म्हणाले. राज ठाकरे माझे मित्र, तर उद्धव ठाकरे माझे शत्रू नव्हे, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांपासून बाळासाहेब ठाकरे, वसंतराव नाईक, शरद पवार असे अनेक नेते लाभले. त्यांनी व्यक्तिगत सुडाचे राजकारण केले नाही. केंद्रीय तपास यंत्रणा किंवा पोलिसांचा गैरवापर करून आपल्या राजकीय विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. हे सत्य आहे. ही सुरुवात या राज्यात आणि देशात भाजपने केली. त्यामुळे राज्याचा आणि देशाचा माहोल बिघडला, असेही राऊत यावेळी म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ असू नये ही आमची पहिल्यापासून भूमिका आहे. सत्तेवरती कोण येते आणि कोण राहते यापेक्षा महाराष्ट्राचे वातावरण चांगले राहिले पाहिजे हा विचार करणारे लोक आम्ही आहोत. कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेले माणसं आहोत. आम्ही कधीही व्यक्तिगत शत्रुत्व ठेवले नाही. पण हे राजकारण भाजपने सुरू केले. फडणवीस यांच्या नेतृत्वाकडून आम्हाला चांगली अपेक्षा होती, पण त्या काळामध्ये त्यांना अशा लोकांनी घेरले आणि ज्यांनी फडणवीस यांची प्रतिमा पूर्णपणे मलिन करून टाकली.
मुंबईपासून ते नागपूरपर्यंत महानगरपालिका निवडणूक शिवसेना स्वबळावर लढणार, संजय राऊत यांची घोषणा
शेतकऱ्यांना कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावेच लागणार
शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख मी कोणत्याच भाषणात केला नाही, असे विधान अर्थमंत्री अजित पवार यांनी केले. याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. शेतकरी कर्जमाफीचा उल्लेख भाजपच्या जाहिरनाम्यात आहे. भाजपच्या जाहिरनाम्यात लाडक्या बहिणींना 2100 रुपये आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी हे स्पष्ट लिहिले आहे. त्या सरकारमध्ये अजित पवार अर्थमंत्री आहेत, त्यामुळे ते काय बोलतात याला अर्थ नाही. जाहिरनाम्यातील प्रत्येक वचन सरकारला पूर्ण करावे लागेल. शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी लागेल. लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्यावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List