देशमुख खून प्रकरणातील आरोपी सापडत नाहीत हे गृहखात्याचे अपयश; आठवलेंचा महायुती सरकारला घरचा आहेर
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईबद्दल रिपाइं नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर दोन ते तीन दिवसांत तपास करून पोलीस आरोपींना पकडतात. मग देशमुख खून प्रकरण होऊन 23 दिवस झाल्यानंतरही तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीत, हे गृह खात्याचे अपयश आहे. कारवाईसाठी एवढा वेळ लागायला नको होता, असा घरचा आहेर त्यांनी महायुती सरकारला दिला.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये रामदास आठवले म्हणाले, संतोष देशमुख खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींचा प्रमुख म्हणून वाल्मीक कराड याचे नाव पुढे येत आहे. यामध्ये कराडचा हात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून केला जात आहे. त्यामुळे या खून प्रकरणात कराड याच्या नावाचा समावेश करून त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
खुनाची घटना उघडकीस आल्यानंतर दोन ते तीन दिवसांत तपास करून पोलीस आरोपींना पकडतात. मग देशमुख खून प्रकरण होऊन 23 दिवस झाल्यानंतरही तीन आरोपी अद्यापही पोलिसांना सापडत नाहीत, हे गृह खात्याचे अपयश आहे. देशमुख खून प्रकरणात वाल्मीक कराड याचाच मुख्य हात असल्याचा आरोप केला जात आहे.
शिल्लक मंत्रिपद रिपाइंला मिळावे
लोकसभेला आम्ही दोन जागा मागितल्या होत्या, विधानसभेलाही आम्ही जागा मागितल्या, परंतु दिल्या नाहीत. त्यामुळे आता एक मंत्रिपद शिल्लक आहे ते रिपब्लिकन पार्टीला मिळावे, अशी महायुतीकडे मागणी केल्याचे रिपाइंचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List