शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी; 23 जानेवारी 2026 ला होणार लोकार्पण
दादर येथे महापौर निवासस्थानाच्या जागी बनवण्यात येणाऱया हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात माहिती देताना शिवसेनाप्रमुखांचा जीवनपट उलगडणारे हे स्मारक पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असे असेल, अशी ग्वाही दिली. पुढील वर्ष शिवसेनाप्रमुखांचे जन्मशताब्दी वर्ष असून 23 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या जयंतीदिनी या स्मारकाचे लोकार्पण करू, असे ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी आज स्मारकामध्ये पत्रकार परिषद घेतली. स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱया टप्प्याचे काम सुरू झाले आहे, असे सांगतानाच उद्धव ठाकरे यांनी स्मारकाच्या आर्किटेक्ट आभा लांबा आणि टाटा प्रोजेक्ट यांना धन्यवाद दिले. हे स्मारक ज्या जागी बनवले जातेय ते महापौर निवासस्थान ही केवळ एक वास्तू नाही तर त्याच्याशी शिवसेनाप्रमुखांच्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. शिवसेनाप्रमुखांनी अनेक महत्त्वाच्या बैठका या वास्तूत घेतल्या होत्या. युतीच्या बैठका इथे झालेल्या आहेत. ही हेरिटेज वास्तू आहे. या वास्तूला कुठेही धक्का न लावता तिचे वैभव जपून स्मारकाचे काम करणे हे फार महत्त्वाचे आणि खूप कठीण होते. त्यातच ही वास्तू समुद्राला लागूनच आहे. समुद्राचा रेटा जमिनीच्या खालून मोठा असतो. शेजारीच संयुक्त महाराष्ट्र दालन आहे. त्या दालनाच्या खालून समुद्राचे पाणी झिरपून वर येत होते. नंतर तिथे दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे भूमिगत स्ट्रक्चर बनवताना जिकरीचे होते, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांचा संपूर्ण जीवनपट स्मारकात मांडला जाणार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनाप्रमुखांना अनेक जण विचारायचे की तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाहीत. त्यावर ते म्हणायचे की, मी कपाटातला नाही, मैदानातला माणूस आहे. त्यांचे आयुष्य म्हणजे उघडे पुस्तक होते. त्यांच्या स्मारकातून सर्वांना प्रेरणा मिळायला हवी, अशा भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या.
केवळ पुतळा उभारणे म्हणजे स्मारक नव्हे
शिवसेनाप्रमुखांचा पुतळा स्मारकात उभारला जाणार का असाही प्रश्न माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांचा पुतळा रिगल सिनेमाजवळ उभारला गेला आहे. स्मारकात त्यांचा पुतळा असेल किंवा नसेल. कारण केवळ चार भिंती आणि पुतळा म्हणजे स्मारक नव्हे. ते प्रेरणास्थान बनले पाहिजे.
2026 ला ज्यांचे सरकार असेल तेच उद्घाटन करतील
हे स्मारक सरकारच्या वतीने उभारले जात असल्याने त्याचे श्रेय सरकारला देणार का या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले की, श्रेयवादाच्या लढाईत मला पडायचे नाही. स्मारकाचे काम सरकारच करत आहे, पण स्मारक कसे झाले पाहिजे हे आम्ही पाहत आहोत. शिवसेनाप्रमुखांनी देशातील हिंदूंना दिले, मुंबई व महाराष्ट्राला दिले तेच काम त्यांच्या स्मारकानेसुद्धा पुढील अनेक वर्षे केले पाहिजे त्या दृष्टीने या स्मारकाचा आराखडा केलेला आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. राष्ट्रीय स्मारक असल्याने त्यावेळी जे पंतप्रधान असतील तेच उद्घाटनाला येतील, अशी मिश्कीलीही उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर केली.
पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी स्मारकातील पूर्ण झालेली दालने, महापौर निवासस्थानाची जतन केलेली वास्तू पत्रकारांना दाखवली. स्मारकात वस्तूसंग्रहालयही असणार असून त्यात बाळासाहेबांनी वापरलेल्या वस्तू ठेवण्यात येणार आहेत. साहेबांचा जीवनप्रवास उलगडून दाखवण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचे माध्यमही वापरले जाणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी शिकसेना नेते दिवाकर रावते, शिवसेना नेते-खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, शिवसेना नेते क सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते व सचिव खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते-आमदार सुनील प्रभू, शिवसेना सचिव -आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, मनोज जामसुतकर, माजी महापौर श्रद्धा जाधन, स्नेहल आंबेकर आदी उपस्थित होते.
एकही झाड न तोडता, नवी झाडे लावून स्मारकाचे काम – सुभाष देसाई
स्मारकाचे सचिव शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी यावेळी स्मारकाबाबत माहिती दिली. स्मारकाची संकल्पना व प्रमुख मार्गदर्शक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आहेत. 31 मार्च 2019 रोजी या स्मारकाचे भूमीपूजन करण्यात आले. समुद्रालगत असलेला परिसर, महापौर निवासस्थानाची हेरिटेज वास्तू आणि स्मारक बनवताना एकही झाड कापायचे नाही असा उद्धव ठाकरे यांनी दिलेला आदेश या तीन महत्वाच्या बाबी या स्मारकाच्या बाबतीत होत्या असे सुभाष देसाई यांनी सांगितले.
महापौर निवासस्थानाची जागा स्मारकासाठी ताब्यात आली तेव्हा तिथे 211 झाडे होती. नंतर काही नवीन झाडे लावली गेली. आज या जागेत 233 झाडे आहेत अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली. ही जागा बाळासाहेबांची अत्यंत आवडती जागा होती. अनेक थोरामोठ्यांच्या गाठीभेटी त्यांनी इथे घेतल्या होत्या. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना बाळासाहेबांनी त्यांची इथेच भेट घेतली होती, अशी आठवण सुभाष देसाई यांनी सांगितली.
बाळासाहेबांचे विचार सोडले नाही त्या सर्वांना निमंत्रण
2019 मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्या भूमिपूजनावेळी उपस्थित होते त्यांना उद्घाटनावेळी आमंत्रित करणार का असा प्रश्न माध्यमांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारला. त्यावर, बाळासाहेबांचे विचार सोडले नाहीत त्या सर्वांना आमंत्रित करणार, असा टोला उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाचा नामोल्लेख न करता लगावला.
सहा महिन्यांत दुसरा टप्पाही पूर्ण होईल – आदित्य ठाकरे
पुतळा ही संकल्पना बाजूला ठेवून शिवसेनाप्रमुखांचे समाजकारण, राजकारण आणि त्यांनी केलेले कार्य लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न हे स्मारक बनवताना करत आहोत, असे स्मारकाचे अध्यक्ष आदित्य ठाकरे म्हणाले. आर्किटेक्चरचा भाग पूर्ण झाला असून सहा ते आठ महिन्यांत दुसरा टप्पाही पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले. महापौर निवास या जागेचे एक वेगळेच महत्त्व आहे. ‘मातोश्री’प्रमाणेच बाळासाहेबांनी या महापौर निवासातूनही काम केले होते. 1927 मध्ये बाळासाहेबांचा जन्म झाला त्याच वर्षी या महापौर निवासासमोरील मैदानाचे शिवाजी पार्क असे नामकरण झाले होते. महापौर निवासाच्या पाठीमागे समुद्रात असलेल्या वांद्रे-वरळी सी-लिंकची संकल्पनाही बाळासाहेबांचीच होती, असे आदित्य ठाकरे म्हणाले. कोविडच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या स्मारकाचे भूमिपूजन झाले होते. काम सुरू असताना अनेकदा उद्धव ठाकरे आणि आम्ही येऊन आढावा घेतला. आठवडय़ातून एक-दोन वेळा आम्ही येऊन पाहणी करतो. एकही झाड न तोडता हे काम होत आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
स्मारकाची वैशिष्ट्ये
- महापौर निवासाच्या हेरिटेज वास्तूचे जतन
- आवारातील झाडांच्या वाढीला कोणताही अडथळा न येता स्ट्रक्चरची उभारणी
- स्मारकाच्या इमारतीत विजेच्या दिव्यांची आकर्षक रंगसंगती
- अथांग सागराचा, सी-लिंकचा नजारा पाहण्याचीही व्यवस्था
शिवसेनाप्रमुखांचे फोटो, लेख, बातम्या स्मारकासाठी द्या
शिवसेनाप्रमुखांनी महाराष्ट्र पिंजून काढला. त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली. शिवसेनाप्रमुखांच्या जुन्या आठवणी, फोटो, बातम्या, लेख कुणाकडे असतील तर स्मारकात आणून द्या, पुढच्या पिढीसाठी ते उद्बोधक साहित्य ठरेल, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरे यांनी केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List