कॅलिफोर्नियातील आगीचे रौद्ररूप, 10 ठार; 40 हजार एकर परिसरात तांडव, 29 हजार एकरवर फक्त राख
अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथे भीषण आगीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारपासून सुरू झालेली आग 40,000 एकर परिसरात पसरल्याने तिचे गांभीर्य त्वरित लक्षात येते. दहा हजारहून अधिक इमारती आगीच्या कचाटय़ात सापडल्यामुळे लाखो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आतापर्यंत या आगात दहा जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 29 हजार एकर जमिनीवर फक्त राख पाहायला मिळत आहे. आगीचे मोठमोठे लोट सलग चौथ्या दिवशी रौद्ररूप धारण करत आहेत.
लॉस एंजेलिस राज्यात आणि आजूबाजूच्या परिसरात लागलेली ही सर्वात मोठी आग आहे. अनेकांनी या आगीची तुलना थेट अणुबॉम्बशी केली. प्रशासनाने सुमारे तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना दिल्या आहेत, तर 50 हजारहून अधिक लोकांना तत्काळ घरे सोडून इतरत्र आसरा घेण्यास सांगण्यात आले आहे. भयंकर आगीने संपूर्ण अमेरिकेच्या कारभारावर परिणाम केला आहे. ख्यातनाम व्यक्तींची घरेही आगीमुळे खाक झाली.
दरम्यान, कॅलिफोर्नियामधील अल्ताडेना क्षेत्रात आगीमुळे अक्षरशः अंधार पसरला आहे. ड्रोनद्वारे टिपलेल्या दृश्यांमध्ये आगीची भीषणता समजते. आग लागण्यापूर्वीची दृश्ये आणि आगीच्या तांडवानंतरची दृश्ये यात जमीन-अस्मानाचा फरक जाणवतो. नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, वीज हे अमेरिकेत आग लागण्यामागे प्रमुख कारण आहे, मात्र आगीच्या आजूबाजूच्या परिसरात किंवा भूभागात वीज पडल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. त्यामुळे आगीची वेगवेगळी कारणे समोर येत आहेत.
288 कोटी रुपयांचे घर जळाले
कॅलिफोर्नियातील आगीत एक आलिशान घर जळतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. येथील ऑनलाइन रिअल इस्टेट मार्पेटप्लेस झिलोवर अंदाजे 288 कोटी रुपये किमतीचे घर विक्रीसाठी उपलब्ध होते, मात्र जंगलात लागलेल्या वणव्याने या आलिशान घराची राख केली. वणव्यापासून दुरून टिपलेल्या व्हिडीओत भलेमोठे घर जळताना दिसत आहे. अमेरिकेच्या अभिनय क्षेत्रातील बरीच मंडळी लॉस एंजेलिस येथे वास्तव्यास असते, मात्र आगीमुळे हॉलीवूड हिल्स या भागांना मोठा फटका बसला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List