मराठमोळ्या आयुष म्हात्रेचा धमाका! यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडला, ठोकले खणखणीत शतक
मराठमोळ्या आयुष म्हात्रेने विजय हजारे करंडकात तुफान फलंदाजी करत यशस्वी जयस्वालचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे तो आता प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 150 हून अधिक धावा करणारा सर्वात कमी वयाचा फलंदाज ठरला आहे. अहमदाबादमध्ये पार पडलेल्या नागालँडविरुद्धच्या सामन्यात त्याने हा भीम पराक्रम केला आहे.
विजय हजारे करंडकात आयुष म्हात्रेने मुंबईच्या संघातून पदार्पण केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमवर पार पडलेल्या नागालँडविरुद्धच्या सामन्यात त्याने तोडफोड फलंदाजी केली आहे. नगालाँडच्या गोलंदाजांवर आयुष अक्षरश: तुटून पडला होता. स्टेडियमच्या प्रत्येक कोपऱ्यात त्याने चेंडू टोलवून काढला आहे. त्याने 117 चेंडूंचा सामना करत 11 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 181 धावांची वादळी खेळी केली आहे. त्यामुळे मुंबईच्या संघाला 50 षटकांमध्ये 403 धावांचा डोंगर उभा करण्यात यश आले. विशेष बाब म्हणजे आयुष म्हात्रेने हा भीम पराक्रम वयाच्या 17 व्या वर्षी केला आहे.
यापूर्वी यशस्वी जयस्वालने 17 वर्ष आणि 291 दिवसांचा असताना 2019 साली झारखंडविरुद्ध हा विक्रम आपल्या नावावर केला होता. त्याचा विक्रम आयुषने आता मोडून काढला आहे. त्याने 17 वर्ष आणि 168 दिवसांचा असतानाच या विक्रमाला गवसणी घालत इतिहासात आपल्या नावाची सूवर्ण अक्षरांनी नोंद केली आहे. आयुष म्हात्रेने गेल्या काही दिवसांपासून आपल्या फलंदाजीची जादू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दाखवून दिली आहे. इराणी कप विजेत्या मुंबई संघाचा तो महत्त्वाचा भाग होता. तसेच 19 वर्षांखालील आशिया चषकामध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्वही त्याने केले होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List